११ मृत्यूंना जबाबदार कोण? टॅक्सीत कोंबले जातात १२ प्रवासी; अवैध प्रवासी वाहतुकीला आशीर्वाद कोणाचा?
By मुरलीधर भवार | Updated: April 14, 2026 11:13 IST2026-04-14T11:13:20+5:302026-04-14T11:13:34+5:30
Kaylan Accident: कल्याण परिसराचा नागरी विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सोयीसुविधा मात्र अपुऱ्या आहेत. परिणामी कल्याण-मुरबाड मार्गावर सहा आसनी इको टॅक्सीने नागरिकांना नाईलाजाने धोकादायकपणे प्रवास करावा लागतो.

११ मृत्यूंना जबाबदार कोण? टॅक्सीत कोंबले जातात १२ प्रवासी; अवैध प्रवासी वाहतुकीला आशीर्वाद कोणाचा?
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण परिसराचा नागरी विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सोयीसुविधा मात्र अपुऱ्या आहेत. परिणामी कल्याण-मुरबाड मार्गावर सहा आसनी इको टॅक्सीने नागरिकांना नाईलाजाने धोकादायकपणे प्रवास करावा लागतो. सहा आसनी टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त १२ म्हणजे दुप्पट प्रवासी कोंबले जातात. कल्याण-मुरबाड मार्गावर रायता पुलावर सहा आसनी टॅक्सीच्या भीषण अपघातात ११ जणांचा जीव गेला. अपघातग्रस्त टॅक्सीतही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले गेले होते.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून हात आखडता घेतला जात असल्याने त्याला आळा कोण घालणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय ज्या सहा आसनी वाहनांची मुदत संपली आहे. ती वाहने स्क्रॅपमध्ये काढली जात नाहीत, याकडेही जागरूक नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
जादा प्रवासी बसवण्यासाठी टॅक्सीत अंतर्गत बदल
- कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून मुरबाडच्या दिशेने सहा आसनी इको टॅक्सी चालविल्या जातात. कल्याण ते मुरबाड प्रति प्रवासी ५० रुपये भाडे आकारले जाते.
- सहा आसनी टॅक्सीत १२ प्रवासी कोंबले जातात. काही चालकांनी टॅक्सीत जास्त प्रवासी बसविता यावेत, यासाठी अंतर्गत बदल केले आहेत.
- या अंतर्गत बदलास अर्थातच आरटीओची परवानगी नाही. मात्र, वाहनांची तपासणीच होत नसल्याने अवैधपणे प्रवासी वाहतूक सुरू आहे.
चालक बसतो कोपऱ्यात
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबल्याने चालकाला बसण्यासाठी जेमतेम जागा असते. गिअर टाकण्यास अडचण येते. प्रवाशांना घाई असते. त्यांना वेळेत कल्याण आणि मुरबाड गाठायचे असते. त्यामुळे झटपट प्रवासासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी सहा आसनी टॅक्सीचा पर्याय निवडतात.
अपघातग्रस्त टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
अपघातग्रस्त टॅक्सी परवानाधारक होती. मात्र त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. नियमभंग कारवाईबाबत कल्याणचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल यांनी सांगितले की, मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत १,८९६ चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे.
ज्या सहा आसनी गाड्यांची मुदत संपली आहे त्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी संबंधित चालक, मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
‘या’ मार्गांवरही धोका?
सहा आसनी टॅक्सी कल्याण-शीळ, कल्याण-नेवाळी-मलंगगड, कल्याण भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. या मार्गावरही टॅक्सी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी टॅक्सीत कोंबून जीवघेणी वाहतूक करतात. त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा कल्याण-मुरबाड रस्त्यावरील अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
८० टॅक्सी धावतात
कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर कांबा, वरप, रायता, गोवेली, किशोर, मामनोली गावे आहेत. येथील ग्रामस्थांना शैक्षणिक आणि नाेकरी-धंद्यानिमित्त कल्याणला यावे लागते.
अनेक चाकरमानी रस्ते मार्गाने कल्याण ते मुंबई प्रवास करतात. कल्याण-मुरबाड मार्गावर अनेक शिक्षण संस्था आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनाने तेथे जावे लागते. या मार्गावर ८० टॅक्सी धावतात.