उल्हासनगरात सिंधूनगर स्टेशनचे स्वप्न लवकरच साकार होणार - आमदार कुमार आयलानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:55 IST2026-04-30T21:55:19+5:302026-04-30T21:55:46+5:30
करोडो रुपयांच्या निधीतून उल्हासनगर शहराचा होणार विकास

उल्हासनगरात सिंधूनगर स्टेशनचे स्वप्न लवकरच साकार होणार - आमदार कुमार आयलानी
उल्हासनगर : मेट्रो ५-अ प्रकल्पासाठी राज्य सरकारने ४०६३ कोटी रुपयांचा शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे आता उल्हासनगरमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन आता पूर्ण होत असून प्रस्तावित स्थानकांपैकी एका स्थानकाचे नाव सिंधूनगर स्टेशन असेल, असा विश्वास आमदार कुमार आयलानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे.
उल्हासनगरातील विकासकामांचा आ. कुमार आयलानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर आढावा घेतला. शहरातील मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ९९ कोटी रुपयांचा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त १२० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आयलानी म्हणाले. शहरातील गल्ल्या, छोटे रस्ते आणि सार्वजनिक शौचालयांच्या विकासासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पावसाळ्यापूर्वी सर्व प्रभागांत कामे सुरू होतील, असेही ते म्हणाले.
शहरासाठी २२० कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलस्रोत विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात शहरवासीयांना २४ तास पाणी मिळावे आणि ते देखील मोफत उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. बांधकामे नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी, एडीटीपी संदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवण्यात आल्या असून, यामुळे जर्जर आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
मेट्रोसाठी विशेष प्रयत्न
मेट्रो प्रकल्पामुळे कोणत्याही नागरिक किंवा व्यापाऱ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी मेट्रो मार्ग भूमिगत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार आयलानी यांनी स्पष्ट केले. तसेच एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या सात प्रमुख रस्त्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जातील. असा विश्वास व्यक्त केला. भाजप-शिवसेना महायुती सरकार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात उल्हासनगर हे एक आधुनिक आणि सर्व सुविधांनी संपन्न शहर म्हणून ओळखले जाईल असेही आयलानी म्हणाले आहे.