Signs of change in Ulhasnagar, Mayor of Shiv Sena? | उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?
उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?

सदानंद नाईक 
उल्हासनगर : राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमी टीम एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ नोंव्हेबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपत असून त्यापूर्वी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने परंपरागत मित्र शिवसेनेला बगल देत ओमी टीमसोबत आघाडी केली. ओमी कलानी टीमचे समर्थक भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरले. भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्थानिक साई पक्षाच्या मदतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी विराजमान झाल्या. उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला दिले, तर ओमी टीमला विविध पदांसाठी सव्वा वर्ष झुलवत ठेवले. अखेर, सव्वा वर्षांनी ओमी टीमच्या, मात्र भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरनिवडीला तीन महिन्यांची मुदत दिली असून, ती २१ नोव्हेंबरला संपत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. या प्रकाराने नाराज झालेले ओमी कलानी यांनी ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. निवडणुकीदरम्यान कलानी कुटुंबाची भाजपने चोहीकडून कोंडी केली, तसेच ओमी समर्थक नगरसेवकांना व्हीप काढून भाजपचे काम करण्यास सांगितले. हे कमी म्हणून की काय, ओमी कलानी टीमच्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली. अखेरच्या दोन दिवसांपूर्वी कलानी कुटुंबाऐवजी कुमार आयलानी यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. कलानीपाठोपाठ साई पक्षाला भगदाड पाडल्याचा आरोप आता शहरातून होत आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम शहरातील राजकारणावर होऊन शिवसेनेचा महापौर होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.
>नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची निवडणूक
महापौरपदाचा कालावधी आॅक्टोबर महिन्यात संपला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन, ती मुदत २१ नोंव्हेबर रोजी संपत आहे. २१ नोंव्हेबरपूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता असून पालिकेत सत्तांतराचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

Web Title: Signs of change in Ulhasnagar, Mayor of Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.