Shocking! Motorcyclist dies after falling into pit in Thane: Two critically injured | धक्कादायक! ठाण्यात ट्रेलरच्या धडकेने खड्डयात पडून मोटारसायकलस्वाराचा मृत्यु: दोघे गंभीर जखमी

घोडबंदररोडवरील घटना

ठळक मुद्देट्रेलर चालक पसारघोडबंदररोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भरधाव ट्रेलरने कट मारल्यामुळे दुचाकी घसरून खडयात पडून झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील सिद्धेश हेमंत मोरे (२६, रा.दोस्तीविहार,वर्तकनगर, ठाणे) याचा मृत्यु झाला. तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या अपघातामध्ये राजेश यादव (२६, रा.वसंतविहार) आणि देव ठक्कर (२३, रा.दोस्तीविहार, वर्तकनगर) हे अन्य दोघे त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. पेट्रोल भरून तिघेही एकाच मोटारसायकलवरून घरी परतत असताना २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठाण्यातील दोस्तीविहार गृहसंकुलात राहणारा सिद्धेश हा त्याच गृहसंकुलातील देव आणि राजेश या मित्रांसमवेत रविवारी पहाटे दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गायमुख येथे गेले होते. पेट्रोल भरून परतत असतांना पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रस्त्यावर पाठीमागून भन्नाट वेगाने आलेल्या ट्रेलरने अचानक मार्गिका बदलत वाहतुकीच्या नियमांचा भंग केला. सिद्धेशच्या दुचाकीच्या समोर येत कट मारला. ट्रेलरच्या धक्याने दुचाकी रस्त्यावरुन खाली घसरुन खड्डयामध्ये गेल्याने सिद्धेश झाडाला धडकला गेला. यात डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला. तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले. या दोघांवरही एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पसार झालेल्या ट्रेलर चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking! Motorcyclist dies after falling into pit in Thane: Two critically injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.