लोकसभेवर नजर ठेवून खरा ‘आनंद’ शिंदेसेनेला
By मुरलीधर भवार | Updated: May 18, 2026 07:47 IST2026-05-18T07:46:39+5:302026-05-18T07:47:00+5:30
दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे ठाण्यातून चार वेळा खासदार होते. त्यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उच्चशिक्षित आनंद यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

लोकसभेवर नजर ठेवून खरा ‘आनंद’ शिंदेसेनेला
-मुरलीधर भवार
प्रतिनिधी
दलत्या राजकीय परिस्थितीत राजकीय सोयीसाठी कोणत्या पक्षात कोण कधी उडी घेईल, हे काही सांगता येत नाही. तेच माजी खासदार आनंद परांजपे यांच्याबाबतीत घडले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विधानपरिषदेवर वर्णी लागत नाही, हे कळताच परांजपे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांची राजकीय दूरदृष्टी भविष्यात सूचित होईलच. दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे ठाण्यातून चार वेळा खासदार होते. त्यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उच्चशिक्षित आनंद यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळी ते पत्रपरिषदेत वडिलांच्या आठवणीने रडले होते. आनंद यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना पराभूत केले. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रवादीचेच वसंत डावखरे यांनाही पराभूत केले.
शिवसेनेत घुसमट सुरू झाल्यावर आनंद यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले कल्याण, डोंबिवली काबीज करायचे होते. डोंबिवलीत एक ब्राह्मण चेहरा देण्याचा आपला प्रयत्न पवारांनीच फसविला. प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘हाफ चड्डीवाले’ असा उल्लेख करीत टीका केली. त्यामुळे परांजपेंविरोधात मतदान झाले व श्रीकांत शिंदे हे निवडून आले.
पराभूत झाल्यानंतर परांजपे यांचे राष्ट्रवादी राजकीय पुनर्वसन करणार असे वाटले होते. मात्र, ते २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत काही झाले नाही. ठाण्यातून त्यांनी २०१९ ला शिवसेनेचे राजन विचारे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यांचा पराभव झाला. मग राजकारणाने वेगळे वळण घेतले. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीही फुटली. शरद पवार यांचा हात धरून राष्ट्रवादीत आलेल्या परांजपे यांनी त्यांचाही हात सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणे पसंत केले. पुढे विधानपरिषद मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा पक्षात मोठे बदल होत विधानपरिषद झिशान सिद्दिकी यांच्याकडे गेली. या परिस्थितीचा फायदा घेत शिंदेसेनेने परांजपे यांना आपल्या गोटात ओढले.
२००८ ते राष्ट्रवादीत प्रवेशापर्यंत परांजपे यांंच्या राजकारणाला सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिशा दिली होती. प्रवेशापश्चात परांजपे यांनी ‘माझा डीएनए शिवसेना’ असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत खा. शिंदे यांच्या निवडणूक प्रचारात परांजपे सहभागी झाले होते. कारण राज्यात महायुती सत्तेवर आली होती. २०२९ मध्ये पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना होऊन कल्याण लाेकसभा मतदारसंघाचे दोन मतदारसंघ होणार आहेत. त्यापैकी एका मतदारसंघातून परांजपे हे शिंदेसेनेचे उमेदवार असतील, असे राजकीय गणित आहे.