Sex racket under the name of Spa, 'Manager arrested | ‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट, ‘मॅनेजर’ला अटकच चार तरुणींची सुटका

‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट, ‘मॅनेजर’ला अटकच चार तरुणींची सुटका

‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट, ‘मॅनेजर’ला अटकच चार तरुणींची सुटका

ठाणे: घोडबंदर रोड येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह (२८, रा. गोंडा, उत्तर प्रदेश, हल्ली रा. अंधेरी, मुंबई) या ‘मॅनेजर’ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमधील ‘इलिगंट स्पा अँड सलून’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील या स्पामध्ये मंगळवारी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या पथकाने बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराची खात्री केली. तिथे मागणीनुसार शरीरविक्रयासाठी मुली पुरविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाडसत्र राबविले. 

या कारवाईमध्ये स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या तावडीतून या चार मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

असे चालायचे सेक्स रॅकेट
या स्पामध्ये संपूर्ण बॉडी मसाजसाठी अडीच हजार रुपये एका ग्राहकाकडून घेतले जायचे. यात तो तयार झाल्यानंतर त्याला खाणाखुणा करीतच आणखी स्पेशल मसाजसाठी खुणवले जायचे. यातही त्याने तयारी दर्शविली की त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली जायची. यातील काही रक्कम या तरुणींना तर काही रक्कम ‘मॅनेजर’कडे वळती केली जात होती. बिनधास्तपणे सुरु असलेल्या या अनैतिक व्यवसायाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हे धाडसत्र राबविले.

Web Title: Sex racket under the name of Spa, 'Manager arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.