शिंदेसेना-भाजपचा वाद वरिष्ठ साेडविणार; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:48 IST2026-05-18T05:47:29+5:302026-05-18T05:48:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेतील भाजप आणि शिंदेसेनेत महासभेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ...

शिंदेसेना-भाजपचा वाद वरिष्ठ साेडविणार; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेतील भाजप आणि शिंदेसेनेत महासभेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पक्षाच्या नगरसेवकांची रविवारी विशेष बैठक घेतली. महायुतीच्या माध्यमातूनच ठाणे पालिकेचा कारभार पुढे जाणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिंदेसेनेसोबतचा वाद वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सोडवला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
वर्तकनगर कार्यालयात बैठक
वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात जवळपास दोन तास बैठक चालली. बैठकीला पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सुत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत भाजप नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महासभेत चर्चा न करता विषयपत्रिका मंजूर केली जाते, निर्णय प्रक्रियेत भाजपाला डावलले जाते, तसेच प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या.
मागील काही महिन्यांपासून असलेली नाराजी यावेळी उघडपणे व्यक्त करण्यात आली. पक्ष नेतृत्त्वाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर चव्हाण यांनी नगरसेवकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.
उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू
बैठकीनंतर चव्हाण म्हणाले की, ठाणे महापालिकेचाही कारभार महायुतीच्या समन्वयातून चालावा, हा आमचा प्रयत्न राहील. महासभेत चर्चा न करता विषय मंजूर होत असल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. मात्र, सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न
केला जाईल.