भिवंडीत परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 05:13 PM2020-10-17T17:13:36+5:302020-10-17T17:14:17+5:30

Bhiwandi : परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे.

Return rains in Bhiwandi cause huge damage to paddy crop, farmers are worried | भिवंडीत परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

भिवंडीत परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

Next

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. शेतात पीक जोमाने आल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र शेतातील ही भातपिके शेतात डौलाने डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हैदोस घालीत बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला असून परतीच्या पावसामुळे भिजलेली पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. 

शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले व हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावल्याने हे पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पीक आणून ठेवली आहेत. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली , वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव ,मुठवळ,चिंबीपाडा,कुहे ,धामणे ,खारबांव ,पाये ,पायगांव ,खार्डी ,एकसाल ,सागांव ,जुनांदुर्खी ,टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा ,बासे ,मैदे ,पाश्चापूर, वडुनवघर , खारबाव ,  या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जात असून यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून मातीमोल केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.  तर शेतात कापून ठेवलेले भाताचा एकएक दाणा वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी चक्क भिवंडी - वाडा रोडवरील रस्ते दुभाजकावर ठेवण्याची  शेतकऱ्याची धडपड पाहावयास मिळत आहे . शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

दरम्यान, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी अंबाडी खरिवली परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे म्हणत त्यांना दिलासा दिला व कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज आपण स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून तसे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत . अशी प्रतिक्रिया भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे. 

Web Title: Return rains in Bhiwandi cause huge damage to paddy crop, farmers are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.