सायकल ट्रॅक? छे ! पार्किंग झोन...ठाण्यात सायकलस्वारांना ‘नो एंट्री’! फेरीवाल्यांनी ठोकले बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:13 IST2026-05-02T06:12:46+5:302026-05-02T06:13:21+5:30

बेकायदा पार्किंग, फळ-भाजी विक्रेते आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आढळले

Cycle track? Yes! Parking zone...'No entry' for cyclists in Thane! Hawkers protest | सायकल ट्रॅक? छे ! पार्किंग झोन...ठाण्यात सायकलस्वारांना ‘नो एंट्री’! फेरीवाल्यांनी ठोकले बस्तान

सायकल ट्रॅक? छे ! पार्किंग झोन...ठाण्यात सायकलस्वारांना ‘नो एंट्री’! फेरीवाल्यांनी ठोकले बस्तान

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे - वाहनांचे पार्किंग, ठाण मांडून बसलेले फळ-भाजी विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स... अधून-मधून धावणारे जॉगर्स, वॉकर्स... हे कुठल्या बागेतील किंवा समुद्रकिनाऱ्यावरील चित्र नसून ठाण्यातील सायकल ट्रॅक आहेत. सायकलस्वारांच्या सुरक्षेसाठी उभारलेले ट्रॅक वाहनांचे पार्किंग झोन झाले आहेत. काही ठिकाणी फेरीवाले तर काही जॉगर्सनी ते बळकावले आहेत.

त्यावर कडी म्हणजे ट्रॅकवरून जाणाऱ्या सायकलस्वारांना येथे हटकले जाते. त्यामुळे अनेकवेळा वादही निर्माण होतात. ‘लोकमत’च्या पाहणीत हे धक्कादायक चित्र दिसले. मग कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले सायकल ट्रॅक नेमके कोणासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत ट्रॅकवर रिक्षा, चारचाकी वाहने, बस यांचे बेकायदा पार्किंग, फळ-भाजी विक्रेते आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आढळले. आणखी गंभीर बाब म्हणजे जॉगर्स आणि वॉकर्सही मोठ्या प्रमाणावर सायकल ट्रॅकचा वापर करतात.

सध्याचे ट्रॅक दर्जेदार असले तरी ते सलग नसल्याने मध्येच रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. डेडिकेटेड सायकल ट्रॅक असावेत, अशी सायकलप्रेमींची मागणी आहे. पाच वर्षांपूर्वी पवारनगर येथे ५२ लाख रुपये खर्चून ८०० मीटरचा सायकल ट्रॅक तयार केला होता. त्यानंतर अलीकडेच तो ४०० मीटरने वाढवून डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचा चौक ते पोखरण रोड नंबर दोन असा १,२०० मीटरचा केला आहे. दुसरा सायकल ट्रॅक हॅप्पी व्हॅली ते  नीळकंठ ग्रीनपर्यंत ६०० मीटरचा केला. त्यानंतर हावरे सिटी येथे २०० मीटर असे नवीन सायकल ट्रॅक केले आहेत. 

काय करता येईल उपाय?: ट्रॅक सध्या अप-डाऊनसाठी एकाच बाजूला असल्याने रुंदी जास्त आहे. त्यामुळे ट्रॅकची योग्य रचना करून दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्ग तयार केल्यास सायकलस्वारांना सुरक्षित प्रवास करता येईल. तसेच, हायवेवर ट्रॅक विकसित केल्यास नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढण्यास मदत होईल, असा उपाय सायकलप्रेमी सुनील ओहोळ हे सुचवतात.

सायकल ट्रॅकचा वापर सायकलिंगसाठी होतच नाही. नागरिक जॉगिंग, व्यायामासाठी ट्रॅकचा वापर करतात. सायकलस्वारांना ते विरोध करतात. अनेकदा वाद होतात. ट्रॅक केवळ सायकलस्वारांसाठीच राखीव व्हावा. - दीपेश दळवी, सचिव, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन

सायकल ट्रॅक दिवसभर सायकलस्वारांसाठी खुला असायला हवा; मात्र प्रत्यक्षात तो वॉकर्स आणि पार्किंगने व्यापलेला असतो. सकाळी लवकर आले तर ट्रॅकवर गाड्यांची रांग दिसते.- डॉ. वैशाली दोंडे, महिला सायकलस्वार

कळवा आणि पारसिकनगर भागात सायकल ट्रॅकच नाही. या भागात सायकलस्वारांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित ट्रॅकची तातडीची गरज आहे.- विशाल खरपुडे, सायकलप्रेमी

Web Title : ठाणे के साइकिल ट्रैक: साइकिल चालकों के लिए नहीं, पार्किंग और विक्रेताओं के लिए!

Web Summary : ठाणे में साइकिल चालकों की सुरक्षा के लिए बने ट्रैक अब पार्किंग क्षेत्र बन गए हैं, जिन पर विक्रेताओं और पैदल चलने वालों का कब्जा है। साइकिल चालकों को बाधाओं और विवादों का सामना करना पड़ता है। दुर्घटनाओं को रोकने और सुरक्षित साइकिलिंग सुनिश्चित करने के लिए समर्पित, निरंतर ट्रैक की आवश्यकता है।

Web Title : Thane's Cycle Tracks: Not for Cyclists, but Parking and Vendors!

Web Summary : Thane's cycle tracks, built for cyclists' safety, are now parking zones occupied by vendors and walkers. Cyclists face obstruction and disputes. Dedicated, continuous tracks are needed to prevent accidents and ensure safe cycling.