coronavirus: मृतदेह अदलाबदली प्रकरण : ठाण्यातील रुग्णालय अधिष्ठातांची उचलबांगडी, चार परिचारिका निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 11:42 PM2020-07-09T23:42:22+5:302020-07-09T23:43:22+5:30

कोरोना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदलप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय, यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

coronavirus: Dead Body exchange case: Thane hospital superintendent transfer, four nurses suspended | coronavirus: मृतदेह अदलाबदली प्रकरण : ठाण्यातील रुग्णालय अधिष्ठातांची उचलबांगडी, चार परिचारिका निलंबित

coronavirus: मृतदेह अदलाबदली प्रकरण : ठाण्यातील रुग्णालय अधिष्ठातांची उचलबांगडी, चार परिचारिका निलंबित

Next

ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदलप्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली. याप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय, यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या संपूर्ण एक आठवड्यापासून सुरू असलेल्या मृतदेह अदलाबदल प्रकरणावर महापालिका तसेच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात आली. राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनीही याप्रकरणी कारवाईचे संकेत भाजपसह सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांना गुरुवारी दिले.

त्यापाठोपाठ, आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिलगिरी व्यक्त करण्याबरोबरच वैद्यकीयदृष्ट्या पालिकेची कोणतीही चूक नसल्याचीही सारवासारव केली. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकार घडल्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानुसार, अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांना नेमले आहे. यापुढे मात्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून रुग्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे.

रुग्णाच्या फाईलवर त्याचे छायाचित्र लावणार
कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या फाइलवर दर्शनी भागात त्याचे छायाचित्र लावले जाणार आहे. तसेच डिजिटल हॅण्डबॅण्ड प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार करताना किंवा दुर्दैवाने मृत्यू झालाच, तर अदलाबदलीसारखे प्रकार होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मृत्यूदर कमी करण्यावर भर
औषधांबरोबर काही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे बोलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. शर्मा म्हणाले, सध्या तरी पुरेसा औषधांचा साठा आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. यात नागरिकांचा ताप, आॅक्सिजनचे प्रमाणही तपासले जात असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम जाणवू लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

जास्तीतजास्त तपासण्या करून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी समोर येत असली, तरी रुग्ण बरे करण्यावर आणि मृत्युदर कमी करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पालिका आयुक्तांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काही आकडेवारी सादर करूनमहापालिकेने कोविड रुग्णांसाठी तसेच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: coronavirus: Dead Body exchange case: Thane hospital superintendent transfer, four nurses suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.