Corona Vaccination: दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:45 AM2021-04-09T00:45:19+5:302021-04-09T00:45:33+5:30

ठाणे शहरातील दहा केंद्रे बंद : मागणी करूनही लस उपलब्ध नाही

Corona Vaccination: Storage of vaccines is sufficient for two days | Corona Vaccination: दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

Corona Vaccination: दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

Next

ठाणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आता लसींचादेखील तुटवडा जाणवू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेकडे केवळ दोन दिवसांचाच साठा शिल्लक असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे शहरात गुरुवारी ५६पैकी केवळ ४४ लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची केंद्रांकडे धाव वाढू लागली आहे. त्यामुळे दोन दिवसांत लसीकरणाचा आवश्यक साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य विभागातील डॉक्टर्स कर्मचारी यांना देण्यास सुरुवात केली. त्यावेळी विविध संस्थांनी त्यांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. आता ४५ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. आपल्या हद्दीतील नागरिकांना लस मिळावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने ४५ ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून ११ ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. त्यानुसार शहरातील ५६ केंद्रांवर लसीकरण केले जात होते. परंतु, आता लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ठाणे महापालिकेची केवळ ३३ केंद्र गुरुवारी सुरु होती. उर्वरित केंद्र बंद होती, तर काही केंद्रांवर यापूर्वीच एक दिवस किंवा दोन दिवसाआड लस दिली जात आहे. त्यानुसार सध्या महापालिकेचे ३३ आणि खासगी ११ अशा मिळून एकूण ४४ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज पाच ते सात हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु, हा आकडादेखील खाली आल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोविशिल्डचा साठा प्राप्त झाला होता, तर कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ८५ हजार ६२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, नागरिकांची रोजची वाढती संख्या लक्षात घेता, ठाण्यासाठी पाच ५ लाख लसींचा साठा मिळावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु, तोदेखील उपलब्ध होऊ शकला नसल्याची माहिती महापालिकेने दिली. सध्या ठाणे महापालिकेकडे कोव्हॅक्सिनचा अवघा सात हजार ३२० लसीचा साठा उपलब्ध आहे, तर कोविशिल्डचा १९ हजार ३१० एवढा साठा शिल्लक आहे. हा साठा दोन दिवस पुरेल एवढा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यानंतर साठा उपलब्ध झाला नाही तर मात्र लसीकरण केंद्र बंद करावी लागतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

लसीचा साठा अपुरा असल्याने आपल्याला लस मिळावी, यासाठी महापालिकेच्या विविध केंद्रांवर नागरिकांनी धाव घेतली होती. परंतु, लसीकरणाचे प्रमाणही महापालिकेने गुरुवारी कमी केल्याचे चित्र दिसत होते. काेराेनाचा धाेका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार पुन्हा ठप्प हाेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांना चिंता सतावत असून लस घेण्यासाठी केंद्रात रांगा लावत आहेत.

पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. जास्तीचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, अद्याप पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही.
- डॉ. राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा

Web Title: Corona Vaccination: Storage of vaccines is sufficient for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.