भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:55 IST2026-04-28T06:55:04+5:302026-04-28T06:55:47+5:30
सरनाईक हे समर्थकांकडून भूमिपुत्रांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
ठाणे - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. भाईंदरपाडा भागातील भूमिपुत्रांची १२ गुंठे जमीन सरनाईक आणि त्यांच्या विहंग बिल्डर्सचे काम करणाऱ्या इतरांनी बळकावल्याचा आराेप मेहता यांनी केला आहे. त्यासाठी त्यांना सह-आराेपी करून कारवाईची मागणीही पाेलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
भाईंदरपाड्यात खासगी सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी दाेन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती कासारवडवली पाेलिसांनी साेमवारी दिली.
भूमिपुत्रांवरील अन्यायाचा दावा
संबंधित भूमिपुत्रांवर अन्याय झाल्याचा दावा करत आ. मेहता यांनी मीरा-भाईंदरच्या कार्यकर्त्यांसह साेमवारी कासारवडवली पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी मंत्री सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी केली. सरनाईक हे समर्थकांकडून भूमिपुत्रांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
‘विहंग’चे जगताप यांच्या तक्रारीत काय?
विहंग ग्रुप कन्स्ट्रक्शन कंपनीचे आर्किटेक्ट अभिजीत जगताप (३२) यांच्या तक्रारीनुसार, २६ एप्रिल राेजी ते भाईंदरपाड्यातील जागेवर पाेकलेनच्या मदतीने साफसफाईचे काम करत हाेते. त्यावेळी केशव भाेईर हा सुरा घेऊन आला. त्याच्यासाेबत जगन्नाथ भाेईर तसेच इतर आठ ते दहा जण काठ्या आणि दगड घेऊन पाेकलेनवरील चालक अजय सिंग (वय ३५) याला सुऱ्याचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. इतरांनी त्याला मारहाण करून दुखापत केली. हा आमचा प्लाॅट आहे सांगून कामगारांना मारहाण केली. असा आरोप विहंग ग्रुपच्या अभिजीत जगताप यांनी केला आहे.
जगन्नाथ भाेईर यांच्या तक्रारीत काय?
भाईंदरपाडा येथील रहिवासी जगन्नाथ भाेईर (४५) यांच्या तक्रारीनुसार २६ एप्रिलला मध्यरात्री एकच्या सुमारास विहंग बिल्डर्स एलएलपी आणि विहंग मरीना प्राेजेक्टच्या वतीने राेहित मालुसरे आणि त्यांच्यासाेबत असलेल्या ८० ते १०० जणांच्या जमावाने त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मालुसरे यांच्यासह ७० ते ८० जणांविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीच्या मालकीबाबत कायदेशीर पडताळणी केली जात आहे. निष्पक्षपणे चाैकशी केली जाणार आहे. दाेन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. - प्रशांत कदम, पाेलिस उपायुक्त, वागळे इस्टेट