इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:54 IST2026-04-28T08:52:50+5:302026-04-28T08:54:41+5:30
Indonesia Jakarta Train Accident: जकार्ता जवळील बेकासी तिमूर स्टेशनवर एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या प्रवासी ट्रेनच्या महिला डब्याला एका लांब पल्ल्याच्या ट्रेनने जोरदार धडक दिली. या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ बेकाशी तिमुर रेल्वे स्थानकात सोमवारी भयंकर घटना घडली. रेल्वे स्थानकावर उभा असलेल्या एका ट्रेनला एक्सप्रेसने भीषण धडक दिली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ माजली.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्गो ब्रोमो आंगग्रेक नावाच्या एक्स्प्रेसने रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका प्रवासी ट्रेनला जोरदार धडक दिली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ३८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Sensitive Footage: At least four people have died and 38 others were injured after two trains collided at Bekasi Station near Jakarta late Monday, officials say.#Bekasi#Jakarta#Indonesia#TrainCollision#TrainAccident#RailwayAccident#CommuterLine#KAIpic.twitter.com/6T9PtKh4nc
— The Premium 24 (@ThePremium24X) April 27, 2026
इंडोनेशियातील या अपघातामागे जुनाट पायाभूत सुविधा आणि देखभालीचा अभाव असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांतील अपघातांची मालिका पाहता, इंडोनेशियाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. जानेवारी २०२४ मधील सिकालेन्का अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आता जकार्ताजवळ झालेल्या या भीषण धडकेने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात चार कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, २०१५ मध्ये, जकार्ता येथे एका प्रवासी रेल्वेची मिनीबसशी धडक झाली होती, ज्यामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला होता.