शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 05:41 IST2026-04-28T05:40:43+5:302026-04-28T05:41:22+5:30
१३ दिवस आयसीयूमध्ये असताना बाळाने एकदाही डोळे उघडले नाही, त्याच्या अंगात टाकलेल्या नळ्या खराब होत्या, असा आरोपही अर्चना यांनी केला आहे.

शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
मुंबई - वाडिया रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर व नर्सकडून झालेल्या उपचारातील हलगर्जीपणामुळे चार महिन्यांच्या शिवांशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची आई अर्चना पाटील हिने केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार केली असूनपंतप्रधान ते राष्ट्रपती, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलिस आयुक्त या सर्वांसोबत पत्रव्यवहार केला आहे.
अंबरनाथजवळ राहणाऱ्या अर्चना पाटील यांचा मुलगा शिवांश आजारी पडल्याने त्यांनी कल्याणमध्ये त्याच्यावर उपचार केले. तेथील डॉक्टरांनी वाडिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यानंतर त्या वाडियामध्ये आल्या. रुग्णालयाने तपासणी केल्यानंतर बाळाला टीबी झाल्याचे निदान केले व औषधोपचार करून घरी पाठवले. २९ मार्चला पुन्हा त्रास झाल्याने बाळाला वाडियामध्ये दाखल करण्यात आले. पण वरिष्ठ डॉक्टरांनी उपचार न करता केवळ शिकाऊ डॉक्टरांनी व नर्सने त्याच्यावर उपचार केले.
दुसऱ्या दिवशी बाळाचे ऑपरेशन करण्यात आले. छातीत व गळ्यात नळ्या टाकण्यात आल्या व रोज टाळूतून रक्त काढण्यात आले. व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर दोन वेळा व्हेंटिलेटर स्पार्क झाला आणि ऑक्सिजन बंद पडला. १० एप्रिलला बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्हिडीओ काढल्यावर रुग्णालय प्रशासनाने धमकावल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केला आहे. १३ दिवस आयसीयूमध्ये असताना बाळाने एकदाही डोळे उघडले नाही, त्याच्या अंगात टाकलेल्या नळ्या खराब होत्या, असा आरोपही अर्चना यांनी केला आहे.
रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आरोप
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. या दाव्यांबाबत आमच्या बाल रुग्णालयाला कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित केले जात असलेले आरोप अप्रमाणित, दिशाभूल करणारे असून, संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. विशेषज्ञ बाल रुग्णालय म्हणून आम्ही नियमितपणे गंभीर अवस्थेत असलेल्या नवजात शिशू आणि बालकांवर उपचार करतो. आमचे वैद्यकीय पथक ठरवलेल्या वैद्यकीय नियमावलीचे काटेकोर पालन करते, अशी प्रतिक्रिया रुग्णालयातर्फे देण्यात आली.