भाजपाच्या विस्तारक योजनेचा प्रारंभ

By Admin | Updated: May 13, 2017 00:43 IST2017-05-13T00:43:39+5:302017-05-13T00:43:39+5:30

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाने केंद्रस्तरावरून विस्तारक योजना सुरू केली आहे.

BJP's expansion plans begin | भाजपाच्या विस्तारक योजनेचा प्रारंभ

भाजपाच्या विस्तारक योजनेचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाने केंद्रस्तरावरून विस्तारक योजना सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती या योजनेतून २५ मे ते १० जूनदरम्यान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाला.
याप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव उपाध्याय, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समितीच्या कल्याण जिल्हा समन्वय प्रमुखपदी सुरेश पुराणिक यांची निवड झाली.
या वेळी केळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिली. चव्हाण म्हणाले की, कल्याण जिल्ह्यातून ५०० ते ६०० जण विस्तारक योजनेत सहभागी होतील. ते १०६० बुथद्वारे घरोघरी जाऊन सरकारी योजनांची माहिती देतील. तसेच नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतील.
या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डोंबिवली ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील, आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर मोरेश्वर भोईर, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, नितीन पाटील, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड, मंदार टावरे, विश्वदीप पवार, साई शेलार, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी, संजीव बिडवाडकर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's expansion plans begin