पावसाळ्यापूर्वी सज्ज राहा; सर्व यंत्रणांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
By सुरेश लोखंडे | Updated: May 11, 2026 16:16 IST2026-05-11T16:16:02+5:302026-05-11T16:16:42+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी आज विविध विभागांच्या तयारीची सविस्तर समीक्षा केली.

पावसाळ्यापूर्वी सज्ज राहा; सर्व यंत्रणांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
सुरेश लोखंडे, ठाणे : आगामी मान्सून काळात कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि युद्धपातळीवर पूर्वतयारी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी आज विविध विभागांच्या तयारीची सविस्तर समीक्षा केली.
यावेळी डॉ. पांचाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे तातडीने संरचनात्मक ऑडिट करण्याचे आदेश दिले. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने दरडप्रवण घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपर कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तत्परता तपासण्यासाठी पोलीस, अग्निशमन आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. साथीचे रोग रोखण्यासाठी औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
दरडप्रवण गावे, पूरस्थिती, नदीपात्रातील गाळ काढणे, औद्योगिक सुरक्षाव्यवस्था आणि बचाव साहित्याची उपलब्धता यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.