ओडिशातील आणखी गांजा तस्करास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST2021-09-07T04:48:47+5:302021-09-07T04:48:47+5:30

ठाणे : ओडिशामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिशा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी ...

Another cannabis smuggler arrested in Odisha | ओडिशातील आणखी गांजा तस्करास अटक

ओडिशातील आणखी गांजा तस्करास अटक

ठाणे : ओडिशामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिशा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यानेच रमेश बादई आणि दीपक जेना यांच्याकडे तीन लाख ५० हजारांचा ३५ किलो गांजा सोपविल्याचे चौकशीतून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे रेल्वेस्थानकाजवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने २९ ऑगस्ट २०२१ रोजी रमेश आणि दीपक या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीतून ३५ किलोचा गांजाही जप्त केला होता. सखोल चौकशीमध्ये ओडिशातून त्यांनी तो आणल्याची कबुली दिली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याच दोघांच्या चौकशीतून त्यांनी ओडिशातील श्रीकांत याच्याकडून हा गांजा आणल्याची कबुली दिली होती. त्याच आधारे बडे यांच्या पथकाने ओडिशा पोलिसांच्या मदतीने त्यालाही ३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला ६ सप्टेंबरपर्यंत ट्रान्सिस्ट रिमांड मिळाली होती. सोमवारी पुन्हा त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

* ठाणेनगर पोलिसांनी यापूर्वीही ओडिशातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करून २० किलोचा गांजा हस्तगत केला होता. आतापर्यंत ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे. श्रीकांत याने ठाणे मुंबईमध्ये आणखी कुणाला गांजाची तस्करी केली, याचाही शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी सांगितले.

Web Title: Another cannabis smuggler arrested in Odisha