ठाणे - भारतीय चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या एकूण ९८ लाख मूल्याच्या जुन्या नोटा मुंब्रा येथून जप्त करण्यात आल्या आहेत. त्या नोटा कारमध्ये आंब्याच्या पेटीत टाकून मुंबईतील प्रीतेश छाडवा या कापड व्यावसायिकाने बदलण्यासाठी मुंब्य्रात आणल्या होत्या. ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपये दराच्या नोटा घेऊन तो मुंब्य्रात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ चे सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून त्याला अटक केली. तसेच कारची झडती घेतली असता डिक्कीत प्लास्टिक पिशवीत असलेल्या दोन हापूस आंब्यांच्या पेटीत चलनामधून रद्द झालेल्या एक हजार रुपयांच्या ४हजार २५०, तर पाचशे रुपयांच्या ११हजार १०० नोटा असे मिळून एकुण ९८ लाख मिळून आले.रद्द झालेले चलन स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तो या नोटा कोणाला देणार होता, तसेच त्या नोटांच्या बदल्यात त्याला किती मोबदला मिळणार होता. याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त त्रिमुखे यांनी सांगितले. त्याला १५ हजारांच्या रोख रकमेवर जामीन मिळाला आहे. ही कारवाई सहायक पो.उपनिरीक्षक एस.बी. चौधरी यांच्यासह हवालदार प्रकाश कदम, अबुतालीब शेख, पोलीस नाईक सुनील माने, विक्रांत कांबळे, रिझवान सय्यद, शिपाई रामेश्वर कापरे या पथकाने केली.
ठाण्यात ९८ लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 05:45 IST