खरंच? वायरलेस चार्जिंगमुळे तुमचा महागडा फोन 'डेड' होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:24 IST2026-02-09T17:22:44+5:302026-02-09T17:24:40+5:30
केबलची कटकट नाही, फक्त पॅडवर फोन ठेवला की चार्जिंग सुरू! हे फिचर जेवढं सोयीचं वाटतं, तेवढ्याच शंकाही युजर्सच्या मनात आहेत.

खरंच? वायरलेस चार्जिंगमुळे तुमचा महागडा फोन 'डेड' होऊ शकतो का? जाणून घ्या सत्य
स्मार्टफोनच्या जगात सध्या 'वायरलेस चार्जिंग'ची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. केबलची कटकट नाही, फक्त पॅडवर फोन ठेवला की चार्जिंग सुरू! हे फिचर जेवढं सोयीचं वाटतं, तेवढ्याच शंकाही युजर्सच्या मनात आहेत. वायरलेस चार्जिंगमुळे फोन गरम होतो का? बॅटरीचं आयुष्य कमी होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया.
वायरलेस चार्जिंग नक्की काम कसं करतं?
वायरलेस चार्जिंग हे 'इंडक्टिव चार्जिंग' तंत्रज्ञानावर आधारित असते. यामध्ये चार्जिंग पॅड आणि फोनच्या मागील भागात असलेल्या कॉइल्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. या चुंबकीय लहरींद्वारे ऊर्जा ट्रान्सफर केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, वीज वायरमधून नाही तर हवेतून बॅटरीपर्यंत पोहोचते.
खरंच बॅटरीवर परिणाम होतो का?
जर तुम्ही दर्जेदार आणि ब्रँडेड वायरलेस चार्जर वापरत असाल, तर बॅटरीला कोणताही धोका नसतो. आजच्या आधुनिक स्मार्टफोनमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम अत्यंत प्रगत असते. ती ओव्हरचार्जिंग आणि हाय व्होल्टेजपासून फोनचा बचाव करते. मात्र, स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरल्यास बॅटरीचे आयुष्य नक्कीच कमी होऊ शकते.
फोन गरम होणे किती धोकादायक?
वायरलेस चार्जिंग दरम्यान फोन थोडा गरम होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. ऊर्जेचे वहन होताना काही प्रमाणात उष्णता निर्माण होते. पण, जर फोन प्रमाणाबाहेर तापत असेल, तर ते धोक्याचे ठरू शकते. सहसा फोन आणि चार्जिंग पॅड यांचे अलाइनमेंट व्यवस्थित नसेल किंवा चार्जर निकृष्ट दर्जाचा असेल तरच ही समस्या उद्भवते.
वायरलेस चार्जिंगच्या काही मर्यादा
> वायर्ड चार्जिंगच्या तुलनेत वायरलेस चार्जिंगचा वेग संथ असतो.
> चार्जिंग सुरू असताना फोन वापरल्यास बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो.
> तज्ज्ञांच्या मते, कायमस्वरूपी फक्त वायरलेस चार्जिंगवर अवलंबून राहणे टाळावे.
सुरक्षित चार्जिंगसाठी 'या' टिप्स फॉलो करा
> नेहमी ब्रँडेड आणि सर्टिफाइड वायरलेस चार्जरचाच वापर करा.
> शक्य असल्यास रोजच्या वापरासाठी वायर्ड चार्जिंग आणि गरजेनुसार वायरलेस पर्याय निवडा.
> चार्जिंगला लावताना फोनचे कव्हर काढून ठेवल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते.
> फोन आणि पॅड एकमेकांवर नीट सेंटरमध्ये असल्याची खात्री करा.