Coronavirus do not spread fake messages through whatsapp SSS | Coronavirus : ...तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई होणार, वेळीच व्हा सावध

Coronavirus : ...तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई होणार, वेळीच व्हा सावध

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत आहे. याच  दरम्यान सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. असा मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं आवश्यक आहे. कारण फेक मेसेज पाठवणं महागात पडू शकतं. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तिने चुकीचे व्हिडीओ, फोटो, मेसेज किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत जात असतील तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देणं गरजेचं आहे.

कोरोनाबाबत अफवा पसरवून दहशत निर्माण करणाऱ्या आणि याला धार्मिक रंग देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध राज्याच्या सायबर विभागाने आतापर्यंत १३२ गुन्हे नोंदवले. शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अफवा पसरवणारे संदेश व व्हिडीओ येणार नाहीत याची खबरदारी घेणे. तसे न केल्यास तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असा इशारा व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुप अ‍ॅडमिनला देण्यात आला आहे. तसेच ग्रुप सेटिंगमध्ये only admin असे सेटिंग करावे असेही सायबर पोलिसांकड़ून नमूद करण्यात आले आहे.

सायबर महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार, बहुसंख्य गुन्हे कोरोना विषाणू संसर्ग, उपचारपद्धती, लागण झालेल्या व्यक्तींबाबत चुकीची, दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरविल्याबद्दल नोंदवण्यात आले आहेत. तर काही प्रकरणांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाला धार्मिक रंग देत काही व्यक्तींनी समाजमाध्यमांद्वारे दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा धर्म भावना दुखावतील असा मजकूर सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न केला असे निदर्शनात आले. त्यानंतर हा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर सर्वप्रथम जाहीर करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हेगारांना व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग टिकटॉक ,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये १३२ गुन्हे ७ एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड १६, कोल्हापूर १३,पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, जालना ८, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६ , नागपूर शहर ४ , नाशिक शहर ५, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३ , रत्नागिरी ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, उस्मानाबाद १,हिंगोली १ यांचा समावेश आहे .

महाराष्ट्र सायबरने या सर्व गुन्ह्यांचे जेव्हा विश्लेषण केले त्यात असे निदर्शनास आले, आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप  संबंधीत ७९ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २४ तर टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपचे अ‍ॅडमिन रडारवर

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चुकीचे व्हिडीओ, फोटोज, संदेश किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी. ते आपले कर्तव्य आहे. जर आपल्या ग्रुपमध्ये कोणी असे केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही पोलिसांकड़ून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनने याबाबत खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

येथे करा तक्रार

कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp  किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची  माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी असे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात आले आहे.

यंत्रणा टिकटॉकवर

टिकटॉकवरून विविध व्हिडीओ व्हायरल होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सायबर महाराष्ट्रचे उपमहानिरीक्षक हरीष बैजल यांनी टिकटॉकवरून नागरिकांना घरी राहण्याबाबत सूचना दिल्या. तसेच कोणीही अशाप्रकारे अफवा पसरवू नये. तसेच या काळात काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडीओ शेअर करत आहेत. यातच महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी सहन करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : अनुकरणीय! 'या' केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी गरजूंसाठी घरीच शिवले मास्क

Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू

Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्

 

Web Title: Coronavirus do not spread fake messages through whatsapp SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.