"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:21 PM2024-05-22T14:21:45+5:302024-05-22T14:23:07+5:30

Pune Accident - पुण्यातील पोर्श कार अपघाताचे पडसाद राज्यासह देशभरात उमटत आहे. या घटनेत २ जणांचे बळी गेलेत.

Strict action should be taken against the culprits of the Pune accident, the family of deceased Ashwini Koshta demands | "तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश

"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश

जबलपूर - पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं मध्य प्रदेशच्या दोन युवा आयटी इंजिनिअरला कारनं चिरडलं. या घटनेनं पुण्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मृत दोघे जबलपूर आणि उमरिया येथील होते. मंगळवारी या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या अंत्यविधीला वडिलांचा आक्रोश पाहायला मिळाला. मुलीच्या मृत्यूसोबत आमची स्वप्नही तुटली असं मृत अश्विनी कोष्टा हिच्या वडिलांनी म्हटलं आहे. 

मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीनं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येक पित्याला वाटतं, आपल्याला मुलाच्या नावानं ओळखलं जावं. मला अश्विनीचे वडील म्हटलं जातं. जर कायदे असतील तर त्याचे पालनही  केले असते तर ही दुर्घटना घडली नसती असं सांगत वडिलांनी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

तसेच एक अल्पवयीन नशेच्या स्थितीत गाडी चालवत होता. परंतु कुणीही त्याला रोखलं नाही. जर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचं कर्तव्य निभावलं असतं तर मला माझी मुलगी गमवावी लागली नसती. आरोपीविरोधात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून अशी वेळ दुसऱ्यावर येऊ नये. त्यातून सर्वांना धडा मिळेल. आरोपीवर संविधानानुसार कारवाई करणं गरजेचे आहे. इतर कुणीही हे कृत्य पुन्हा करणार नाही असा निर्णय व्हावा अशी मागणी मृत मुलीच्या वडिलांनी केली. 

दरम्यान, अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला परवानगी देणाऱ्या आई वडिलांबाबतही त्यांनी राग व्यक्त केला. जोपर्यंत आपली मुलं वयात येत नाही तोपर्यंत त्यांना वाहन चालवायला देऊ नये. कार चालवण्याआधी त्यांना ती शिकली पाहिजे. आमची मुलगी पुण्यात शिक्षण घेत होती, तिथेच काम करत होती. डिसेंबरमध्ये ती पुण्याला गेली होती असं वडिलांनी म्हटलं.

काय होता प्रकार?

रविवारी रात्री कल्याणीनगर भागात एका लग्झरी कारने २ जणांना धडक दिली. त्यात अश्विनी कोष्टा आणि अन्य एका मुलाचा मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा ही जानेवारीत २४ वर्षाची झाली होती. पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिला लॉकडाऊननंतर तिथेच नोकरी मिळाली. गेल्या ६ वर्षापासून ती पुण्यात राहत होती. अश्विनी शिक्षणात हुशार होती असं तिच्या भावाने सांगितले आहे.

तर आम्ही दोघे भाऊ बहिण होतो, ती माझ्यापेक्षा छोटी होती. घटनेच्या दिवशी तिचं वडिलांची शेवटचं बोलणं झालं होतं. घटनेनंतर तिच्या मित्रांनी आम्हाला फोन करून ही माहिती दिली. एका वेगवान कारनं तिला धडक दिल्याचं सांगितले. आम्ही त्याच रात्री पुण्यासाठी निघालो. या घटनेची योग्य चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी भावाने केली. 
 

Web Title: Strict action should be taken against the culprits of the Pune accident, the family of deceased Ashwini Koshta demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.