सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:46 IST2026-01-03T12:46:09+5:302026-01-03T12:46:39+5:30
फोनचे ब्लूटूथ विनाकारण ऑन ठेवल्यामुळे तुमचे बँक खाते चुटकीसरशी रिकामे होऊ शकते.

सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
आजच्या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन न राहता, ते आपले बँक खाते देखील बनले आहे. आपण गाणी ऐकण्यासाठी किंवा स्मार्टवॉच कनेक्ट करण्यासाठी सतत फोनचे ब्लूटूथ वापरतो. पण, काम झाल्यानंतर तुम्ही ते बंद करायला विसरता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. फोनचे ब्लूटूथ विनाकारण ऑन ठेवल्यामुळे तुमचे बँक खाते चुटकीसरशी रिकामे होऊ शकते.
काय आहे 'ब्लूजॅकिंग'चा धोका?
अनेकांना वाटते की ब्लूटूथ ऑन राहिल्याने फार तर बॅटरी लवकर संपेल, पण खरा धोका 'ब्लूजॅकिंग'चा आहे. जेव्हा तुम्ही रेल्वे, बस किंवा मार्केटसारख्या सार्वजनिक ठिकाणी असता, तेव्हा सायबर गुन्हेगार सक्रिय असतात. ब्लूटूथ ऑन असल्याचा फायदा घेत हे स्कॅमर्स तुमच्या फोनला पेअरिंग रिक्वेस्ट पाठवतात. अनेकदा आपण घाईत किंवा नकळत ती रिक्वेस्ट 'एक्सेप्ट' करतो आणि इथूनच घात सुरू होतो.
असा होतो बँक खात्यावर अटॅक
एकदा का स्कॅमरच्या डिव्हाइसशी तुमचा फोन कनेक्ट झाला की, त्याला तुमच्या फोनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. यानंतर तुमच्या फोनमधील पासवर्ड, बँक डिटेल्स, कार्डची माहिती आणि महत्त्वाचे मेसेजेस चोरणे त्यांच्यासाठी सोपे होते. या माहितीच्या आधारे तुमचे ओटीपी चोरून काही सेकंदात तुमच्या बँक खात्यातील रक्कम उडवली जाऊ शकते.
सुरक्षेसाठी 'या' ४ गोष्टी नक्की करा
जर तुम्हाला या सायबर फसवणुकीपासून वाचायचे असेल, तर खालील खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ब्लूटूथ बंद ठेवा: इयरफोन किंवा इतर ॲक्सेसरीज वापरून झाल्या की त्वरित ब्लूटूथ बंद करण्याची सवय लावा.
सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा: गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात असताना ब्लूटूथ बंदच ठेवा.
अनोळखी रिक्वेस्ट नाकारा: स्क्रीनवर कोणत्याही अनोळखी डिव्हाइसची पेअरिंग रिक्वेस्ट दिसल्यास ती चुकूनही 'एक्सेप्ट' करू नका.
नॉन-डिस्कव्हरेबल मोड: तुमच्या फोनच्या ब्लूटूथ सेटिंगमध्ये जाऊन 'नॉन-डिस्कव्हरेबल' मोड निवडा. यामुळे तुमचे ब्लूटूथ ऑन असले तरी इतरांच्या फोनवर ते दिसणार नाही.