अभिनय क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही

By Admin | Updated: June 28, 2014 00:44 IST2014-06-28T00:44:48+5:302014-06-28T00:44:48+5:30

प्रकट मुलाखत : मृण्मयी देशपांडे यांचे मत

There is no substitute for hard work in the field | अभिनय क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही

अभिनय क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही


सोलापूर : सध्या चित्रपट, नाटक आदी क्षेत्रात अनेक चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीने कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, त्याला पर्याय नाही, करण्यासारखे खूप काही आहे, असे आवाहन सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले.
शिवछत्रपती रंगभवन येथे जनसेवा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘प्रकट मुलाखत’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, प्रयोग परिनिरीक्षक मंडळ सदस्य शिवानंद चलवादी, महिबूब तांबोळी, अभिराज शिंदे, निखिल सावंत, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर जन्मले, बिरू मोटे, तुकाराम बिराजदार, मैनुद्दीन मुलाणी, बापू सलवदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अभिनय क्षेत्र खूप चांगले आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की आपण अभिनय करू शकतो का? स्वत: आपण या क्षेत्राकडे कोणत्या नजरेने पाहतो. जेव्हा स्वत:ला विश्वास बसेल की आपण हे करू शकतो तेव्हा कष्टाची तयारी ठेवून या क्षेत्रात आले पाहिजे. मनापासून जितके काम कराल तितके आपल्यासाठी कमी आहे.
दिग्दर्शन करायला आवडेल का? या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, एखाद्या चित्रपटाला, नाटकाला रसिकांसमोर घेऊन जात असताना मोठी कसरत करावी लागते. मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतूनच एका दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होते. त्यामुळे मला अभिनयापेक्षा दिग्दर्शक म्हणून काम करायला जास्त आवडेल. अभिनयाला शेवट असतो का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, अभिनेत्याला शेवट असतो, मात्र अभिनयाला नाही. प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो त्यामुळे कुठून सुरूवात करायची आणि कोठे थांबायचे हे कळले पाहिजे. उत्तम अभिनयासाठी कोणते गुण असावेत? यावर बोलताना मृण्मयीने भाषेवर प्रभुत्व पाहिजे, निरीक्षणाची क्षमता आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचेही सांगितले. संपूर्ण प्रकट मुलाखतीचे संचलन शोभा बोल्ली यांनी केले.
---------------------
कलेत राजकारण नको
कला आणि राजकारण या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अनेक कलावंत हे राजकारणाशी निगडीत आहेत. कला क्षेत्रात मोठे झाल्यानंतर लाभलेल्या प्रसिद्धीमुळे अनेक कलावंत राजकारणात येतात. मात्र कलेच्या क्षेत्रात राजकारण नसले पाहिजे, जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.

Web Title: There is no substitute for hard work in the field