पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:14 IST2025-06-24T10:13:51+5:302025-06-24T10:14:35+5:30

Pandharpur Chandrabhaga flood: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वीर धरणातूनही ६ हजार ५०० चा विसर्ग

Pandharpur at risk of flood, 31,600 cusecs discharged into Bhima river from Ujjain | पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

पंढरपूर : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जाणार आहेत. वाढता विसर्ग, आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ३१,६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. 

नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित नदीपात्रामध्ये येत आहे. विसर्ग त्यामुळे सद्यःस्थितीतील दोन्ही धरणांतून येणारा विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग राहील.

किनारपट्टीला इशारा

कोकण किनारपट्टीला सोमवारी सायंकाळी ५:३० पासून २५ जून रात्री ८:३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सांगलीत पावसाचा जोर वाढला

सांगली : धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसाने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांत दमदार पाऊस झाला. मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतही अनेक ठिकाणी पाऊस झाला.

कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून, धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २,७३६ घनफूट पाण्याचा विसर्ग असला तरी वारणा व दूधगंगा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने 'वारणा', 'दूधगंगा' नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

गंगापुरातून विसर्ग दुप्पट! गोदावरीला पूरसदृश स्थिती

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी दुपारी विसर्ग दुप्पट करण्यात आला. ६,१६० क्युसेक इतका विसर्ग होत असल्याने गोदावरीला पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कंबरेपर्यंत बुडाली.

Web Title: Pandharpur at risk of flood, 31,600 cusecs discharged into Bhima river from Ujjain