"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:10 IST2026-04-25T08:57:55+5:302026-04-25T09:10:32+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपमधील घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
Anna Hajare Angry After 7 MP Leave AAP: दिल्लीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आम आदमी पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तरुण चेहरा आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या ६ सहकारी खासदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या अनपेक्षित राजकीय भूकंपामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपमधील घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही काळापासून राघव चढ्ढा हे पक्षाच्या मुख्य प्रवाहातून लांब असल्याचे दिसत होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केवळ वैयक्तिक रित्या पक्ष सोडला नसून, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याची खळबळजनक घोषणा केली. या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
"सत्ता आणि पैशाची लालसा": अण्णा हजारे कडाडले
या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राळेगणसिद्धी येथून बोलताना त्यांनी राजकीय पक्षांतराच्या या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला.
"पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाहीत यासाठी कायदा होणं महत्त्वाचं आहे. सत्ता आणि पैशाच्या लालसेमध्ये येऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येतात आणि त्याच्यामध्ये मनमर्जीप्रमाणे सत्ता बदलाचे काम होतं हे काही बरोबर नाही," असं अण्णा हजारे म्हणाले.
"आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता पक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही पक्षातून जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे लागले आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. हे जे चाललं आहे ते फक्त स्वार्थसाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता यासाठी हे सगळं चाललं आहे. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही," असेही अण्णा हजारे म्हणाले.