लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:48 IST2026-04-25T10:48:00+5:302026-04-25T10:48:00+5:30
ट्रम्प यांनी कोणतीही मोठी घोषणा करण्याच्या काही वेळ आधी बाजारांत कोट्यवधी डॉलर्सचे सौदे झाले आहेत. हा निव्वळ ‘योगायोग’ आहे का?

लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
रवी टाले
कार्यकारी संपादक,
लोकमत, अकोला
लोकशाहीमध्ये सर्वोच्च पद गोपनीयतेच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत बांधलेले असते; परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद कल समोर आला आहे. ट्रम्प यांनी मोठी घोषणा करण्याच्या काही वेळ आधी बाजारांत कोट्यवधी डॉलर्सचे सौदे झाले असल्याचे समोर आले आहे. ‘बीबीसी’ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका लेखात अशा घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यातून ‘इनसाइडर ट्रेडिंग’चे गंभीर संकेत मिळत आहेत. सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसलेल्या, गोपनीय माहितीच्या आधारे, शेअर बाजार किंवा इतर आर्थिक बाजारांमध्ये व्यवहार होतात, तेव्हा त्याला ‘इनसाइडर ट्रेडिंग’ म्हणतात.
अमेरिका-इस्रायल आणि इराणयुद्धाच्या नवव्या दिवशी, ट्रम्प यांनी ‘सीबीएस न्यूज’ला दिलेल्या दूरध्वनी मुलाखतीत सांगितले की, हे युद्ध ‘जवळजवळ संपले आहे.’ मुलाखत प्रसारणाच्या ४७ मिनिटे आधीच, खनिज तेलाचा दर घसरण्याचे अनुमान लावून करण्यात आलेल्या करारामध्ये (फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट) एकाएकी प्रचंड वाढ झाली आणि प्रसारणानंतर तेलाच्या किमती तब्बल १४ टक्क्यांनी घसरल्या. म्हणजेच, कोणाला तरी ट्रम्प यांचे वक्तव्य आधीच माहीत होते! त्यानंतर, ट्रम्प यांनी २१ मार्चला इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ल्यांची धमकी दिली आणि दोन दिवसांनीच ‘ट्रूथ सोशल’वर संदेश टाकला की, इराणसोबत ‘अत्यंत सकारात्मक चर्चा’ होऊन, ‘संपूर्ण शांततेचा मार्ग’ मोकळा झाला आहे. त्या संदेशाच्या १४ मिनिटे आधी, तेलाच्या किमती पडण्याचे अनुमान बांधून झालेल्या व्यवहारांमध्ये स्फोटक वाढ झाली आणि संदेश येताच तेलाच्या किमती दहा ते अकरा टक्क्यांनी कोसळल्या.
तत्पूर्वी, ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ रोजी जगभरातील जवळजवळ सर्व देशांवर व्यापक आयात शुल्क (टॅरिफ) लादताच जागतिक शेअर बाजार कोसळले होते; परंतु ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याआधी, ‘एस अँड पी ५००’ निर्देशांकात वाढ गृहीत धरून कोट्यवधी डॉलरचे व्यवहार झाले. अवघ्या १८ मिनिटांनंतर, चीन वगळता सर्व देशांसाठी ९० दिवसांचे ‘टॅरिफ विराम’ जाहीर झाले. लगेच ‘एस अँड पी ५००’ने ९.५ टक्क्यांची जोरदार उसळी घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या उसळींपैकी ती एक होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी सकाळी ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर ‘ही खरेदीची उत्तम वेळ’ असा संदेश टाकला होता!
पुढे डिसेंबर २०२५ मध्ये ‘पॉलिमार्केट’ नामक ऑनलाइन भविष्यवर्तन बाजारात ‘बर्डनसम-मिक्स’ नावाने खाते उघडण्यात आले. त्या खात्यातून २ जानेवारीपूर्वी, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मादुरो हे जानेवारी २०२६ अखेरपर्यंत सत्तेबाहेर जातील, यावर ३२,५०० डॉलर्सची बाजी लागली. अमेरिकन सैन्याने ३ जानेवारीला मादुरो यांना ताब्यात घेतले आणि ‘बर्डनसम-मिक्स’ने तब्बल ४,३६,००० डॉलर्सचा नफा मिळवला. त्यानंतर त्या खात्यातून एकही व्यवहार झाला नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘पॉलिमार्केट’मध्ये सहा नवी खाती उघडण्यात आली आणि अमेरिकेद्वारा इराणवर हल्ला होण्यावर बाजी लावण्यात आली.
ट्रम्प यांनी २८ फेब्रुवारीला इराणवरील हल्ल्याची घोषणा करताच, त्या खात्यांतून एकूण १२ लाख डॉलर्सची कमाई झाली. त्यापैकी पाच खात्यांतून नंतर एकही व्यवहार झाला नाही! ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर हे ‘पॉलिमार्केट’चे गुंतवणूकदार असून, सल्लागार मंडळावरही आहेत. ते ‘पॉलिमार्केट’सारख्याच ‘काल्शी’चेही धोरणात्मक सल्लागार आहेत. या दोन्ही कंपन्या अमेरिकेत अत्यंत वेगाने वाढत असून, त्यांचा साप्ताहिक व्यवहार आता अब्जावधी डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
मध्यंतरी अमेरिकेचे पाकिस्तानसोबतचे संबंध पार रसातळाला गेले होते; परंतु दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी अचानक पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला. सुरुवातीला त्याकडे अफगाणिस्तानातील स्थैर्य किंवा दक्षिण आशियातील भू-राजकीय संतुलन या अंगाने पाहिले गेले; पण नंतर आर्थिक हितसंबंधांचा खळबळजनक संशय व्यक्त झाला. ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो कंपनीने ‘पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिल’सोबत प्राथमिक सामंजस्य करार केल्याची माहिती समोर आली होती. त्याच काळात ट्रम्प यांनी पाकिस्तानला लष्करी मदत पुन्हा सुरू करण्याचे आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचे सूतोवाच केले होते. टीकाकारांच्या मते, पाकिस्तानमध्ये डिजिटल चलनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यास, ट्रम्प कुटुंबाच्या कंपनीला तिथे मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार होती.
राष्ट्राध्यक्षांची प्रत्येक घोषणा कोणाला तरी आधीच माहिती असते आणि त्या आधारे बक्कळ कमाई झाल्याचे सिद्ध झाल्यास, ते राजकीय ‘इनसाइडर ट्रेडिंग’चे सर्वात मोठे प्रकरण ठरेल. हे प्रकरण केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही. जागतिक तेलबाजारातील चढउतारांचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होतो. तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी, घोषणांमुळे होणारे तेल दरातील चढउतार थेट इंधन दर, महागाई, परकीय चलनसाठ्यावर परिणाम करतात. शिवाय, जेव्हा जगातील सर्वात जुनी आधुनिक लोकशाही असलेल्या अमेरिकेतच सत्ताधाऱ्यांवर बाजार हाताळणीचे आरोप होतात, तेव्हा लोकशाही मूल्ये आणि बाजारपेठेतील पारदर्शकतेवरील जागतिक विश्वासालाच धक्का बसतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाइट हाऊस आणि न्यूयॉर्कमधील आर्थिक केंद्र वॉल स्ट्रीटमध्ये काही फरक उरला आहे की नाही?