"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:16 IST2026-04-25T12:16:07+5:302026-04-25T12:16:20+5:30
राकेश बेदींना आदित्य धरने १ कोटीचा बोनस दिल्याची चर्चा झाली.

"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटातील 'जमील जमाली' या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले आहे. ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी साकारलेली ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, 'बॉलीवूड हंगामाने' एका रिपोर्टमध्ये असा दावा केला होता की, या भूमिकेच्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी राकेश बेदी यांना १ कोटी रुपयांचा बोनस दिला आहे. आता या सर्व अफवांवर खुद्द राकेश बेदी यांनी मौन सोडले आहे.
राकेश बेदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या दाव्यांमागचे सत्य सांगितले आहे. ते गंमतीशीर अंदाजात म्हणाले की, "मला अनेकांचे मेसेज आणि फोन येत आहेत की मला १ कोटींचा बोनस मिळाला आहे. पण भावांनो, तो पैसा कुठे पडला आहे? कोणाच्या घरात किंवा खिशात आहे ते मला सांगा. कोणाकडे तो असेल तर सांगा म्हणजे मी जाऊन तो घेऊन येईन, कारण माझ्या बँक खात्यात तर अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही."
राकेश बेदी यांनी पुढे मिश्किलपणे सांगितले की, "जर भविष्यात मला हा बोनस मिळाला, तर मी तुम्हाला सांगेन किंवा कदाचित सांगणारही नाही, पण सध्या तरी मला काहीही मिळालेले नाही. जर तुम्ही मला तो मिळवून देऊ शकत असाल, तर नक्की मदत करा." त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या असून, अनेकांनी दिग्दर्शक आदित्य धर यांना टॅग करून राकेश बेदी यांना खरोखरच बोनस देण्याची विनंती केली आहे.
याआधी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, राकेश बेदी यांना 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही भागांसाठी ५० लाख रुपये मानधन देण्यात आले होते. चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर आदित्य धर आणि लोकेश धर यांनी त्यांना मानधनाच्या दुप्पट म्हणजेच १ कोटींचा धनादेश दिल्याची चर्चा होती. निर्मात्यांच्या या उदारपणाचे सोशल मीडियावर मोठे कौतुक झाले होते, परंतु आता राकेश बेदींच्या खुलाशामुळे हे वृत्त केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राकेश बेदी यांनी या चित्रपटात 'जमील जमाली' या पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील त्यांचे संवाद आणि अभिनय कमालीचा लोकप्रिय झाला. विशेषतः त्यांचा "बच्चा है तू मेरा" (Baccha hai tu mera) हा डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर अनेक मीम्सही बनले आहेत. त्यांच्या या पात्राने 'धुरंधर' फ्रँचायझीमध्ये एक वेगळीच रंगत आणली .
आदित्य धर यांच्या या स्पाय ॲक्शन थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडले आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने १३०० कोटींची कमाई केली होती, तर १९ मार्च २०२६ रोजी आलेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने १७६० कोटींचा टप्पा पार केला आहे. या फ्रँचायझीने आतापर्यंत जगभरातून ३००० कोटींहून अधिक गल्ला जमवला असून, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा एक सर्वात यशस्वी सिनेमा ठरला आहे.