Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:26 IST2026-04-25T08:25:02+5:302026-04-25T08:26:12+5:30
Mumbai Local Train Mega Block: मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर झाल्यामुळे शनिवार रात्रीपासूनच रविवारपर्यंत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा
मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर झाल्यामुळे शनिवार रात्रीपासूनच रविवारपर्यंत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाने हे एकूण ४ वेगवेगळे ब्लॉक घेतले आहेत. या दरम्यान लोकल सेवांसोबतच मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ठराविक स्थानकांपर्यंतच (शॉर्ट टर्मिनेट) चालवल्या जाणार आहेत. यामुळे आठवड्याच्या शेवटी मुंबईकरांच्या प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या कामाचाच एक भाग असलेल्या खर्डी यार्डच्या पुनर्बांधणीसाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान शनिवारी दुपारी १२ ते रविवारी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार असून, कसाराकडे जाणाऱ्या लोकल आसनगाव-टिटवाळा स्थानकांवरच थांबतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होणार आहेत. या कामासाठी १०० लोकलच्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कल्याण-कसारादरम्यान ६७ किमीच्या तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून नव्या मार्गिकेमुळे सेवांमध्ये वाढ होईल. दरम्यान यासाठी खर्डी येथे यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू केले आहे. यासाठी उंबरमाळी ते आटगाव दरम्यान अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीत नॉन-इंटरलॉकिंग कामे होणार आहेत. ब्लॉकमुळे शनिवार दुपारी २:४२ वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटीची लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
लोकल सेवांवर परिणाम
सकाळी ९:३४ ते रात्री ९:३२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावतील
दुपारी १:३० ची कसारा लोकल टिटवाळा येथे शॉर्ट टर्मिनेट काही लोकल गाड्या रद्द
शेवटची व पहिली लोकल
ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन लोकल: शनिवारी सकाळी ८:३३ (सीएसएमटी-कसारा)
ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल: शनिवारी सकाळी १०:१८ (कसारा-सीएसएमटी)
ब्लॉकनंतरची पहिली अप लोकल: रविवारी पहाटे ३:५१ (कसारा-सीएसएमटी)
ब्लॉकनंतरची पहिली डाऊन लोकल: रविवारी पहाटे ४:१९ (सीएसएमटी-कसारा)
टिटवाळा-वासिंददरम्यान आज मध्यरात्री पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत कामांना वेग दिला असून, त्याअंतर्गत टिटवाळा–वासिंद स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय रविवारी हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असणार आहे.
टिटवाळा, खडवली स्थानकांवरील अप आणि डाऊन मार्गांवरील प्लॅटफॉर्म विस्तार, नवीन पॉईंट्सच्या ओएचई (विद्युत यंत्रणा), तांत्रिक दुरुस्तीचे कामकाज मध्यरात्री २.१० ते ३.२५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदलाची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरही रखडपट्टी
रविवार विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सीएसएमटी–चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर ११.४० ते सायं. ४.४० या कालावधीत असणार आहे. ब्लॉक कालवधित सीएसएमटी- वाशी/बेलापूर/पनवेलकडे तसेच सीएसएमटी - वांद्रे/ गोरेगाव दरम्यान लोकल सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवाशांना मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करता येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ‘ताप’
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मेट्रो मार्गिका-६ च्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान दहिसर येथे पादचारी पुलांचे कामदेखील करण्यात येणार आहे. यामुळे उपनगरीय तसेच काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
असा असेल ब्लॉक: जोगेश्वरी–राम मंदिर दरम्यान मेट्रो-६ च्या पोलादी गर्डर्सची उभारणी करण्यासाठी शनिवारी रात्री १०:१५ ते रविवारी सकाळी ८:१५ पर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे सहाव्या मार्गिकेवरील ट्रेन बोरीवली–अंधेरी दरम्यान अप फास्ट मार्गिकेवर वळविण्यात येतील. काही सेवा पूर्णपणे किंवा अंशतः रद्द होण्याची शक्यता. तसेच चर्चगेटवरून शनिवारी रात्री १ वाजताची शेवटची लोकल रद्द करण्यात येणार आहे. विरारवरून पहिली लोकल पहाटे ३:४० वाजता सुटणार असून, ही लोकल गोरेगावपर्यंत धावेल.