Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:48 IST2026-04-25T09:47:33+5:302026-04-25T09:48:42+5:30
कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई: धंद्यात प्रगतीसाठी ५० हजार स्वीकारल्याची तक्रार

Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापृर : काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहरमामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पुण्यात मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
पोलिस सूत्रांनुसार, यातील मनोहर भोसले याने एका व्यापाऱ्यास धंद्यात प्रगती करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते त्यांच्या पथकासह पुण्याला रवाना झाले होते. शुक्रवारी (दि. २४) पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुपारी २ च्या सुमारास मनोहर भोसलेसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा) त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी) या दोघांना ताब्यात घेऊन सायंकाळी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
आज माढा न्यायालयात
मनोहर भोसले व त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना माढा न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सांगितले.
साथीदारांसह महिलांचे शोषण: मनोहरमामावर आश्रमात साथीदारांसह महिलांचे शोषण केल्याचा आरोप असून, करमाळा पोलिसांनी बलात्कार प्रकरणात त्याला ताब्यात घेतले आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर न्यायालयीन कोठडीत मिळाली होती.
बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगायचा स्वत:ला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याच्याविरुद्ध ९ सप्टेंबर २०२१ मध्ये करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात त्याला करमाळा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. तो घोटीच्या आश्रमातून दर अमावास्या-पौर्णिमेला भविष्य बघायचा.मी कर्करोग बरा करतो, असे खोटे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावून त्याने बारामतीच्या शशिकांत खरात यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपये उकळल होते. या प्रकरणात बारामती पोलिसांकडून भोंदूबाबा मनोहरमामाला अटक झाली होती. उंदरगाव ता. करमाळा येथील मठात पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली.