पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:38 IST2026-04-25T08:38:09+5:302026-04-25T08:38:47+5:30

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांच्यावर लाचप्रकरणी कारवाई झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अधिक आक्रमक झाला असून अतिक्रमण विभागासह विविध विभागांतील १३ अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.

13 municipal officials are now under investigation, ACB active in Navi Mumbai after Gaikwad case | पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय

पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांच्यावर लाचप्रकरणी कारवाई झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अधिक आक्रमक झाला असून अतिक्रमण विभागासह विविध विभागांतील १३ अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या माध्यमातून होणाऱ्या कथित भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

नवी मुंबई एसीबीने सापळा रचून कैलास गायकवाड यांच्यावर मंगळवारी कारवाई केली. अतिक्रमणविरोधी कारवाईच्या ठेक्याचे बिल मंजूर करण्यासाठी दोन टक्के ‘बक्षीस’ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सापळ्यादरम्यान तक्रारदार ठेकेदार आणि गायकवाड यांच्यात शहरातील काही बांधकामे आणि ठेक्यांच्या संदर्भात चर्चा झाल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराला लावण्यात आलेल्या रेकॉर्डरमध्ये या संपूर्ण संभाषणाची नोंद झाल्याने अतिक्रमण विभागातील व्यवहारांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण विभागच एसीबीच्या रडारवर आला आहे.

या अधिकाऱ्यांची होणार चौकशी

एसीबीने १३ अधिकारी व अतिक्रमण अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये रोहित ठाकरे, सचिन भगत, प्रशांत 
नेरकर, सुखदेव एडवे, वसंत मुंडावरे, प्रबोधन मवाडे, चंद्रकांत धोत्रे, संजय सोनटक्के, आत्माराम काळे, महेश होलगीर, सागर मोरे, भरत धांडे, अनुराधा बाबर आणि साधना पाटील यांचा समावेश आहे.

आ. मंदा म्हात्रे आक्रमक

उपायुक्त गायकवाड यांच्यावरील कारवाईनंतर आ. मंदा म्हात्रे यांनीही आक्रमक भूमिका घेऊन ‘गायकवाड हे नेमके कोणाचे कलेक्टर होते,’ असा सवाल केला होता. घणसोलीत दीर्घकाळ नियुक्तीवर असलेल्या काही अभियंत्यांसह इतर विभाग अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई वळली आहे. पालिकेत ट्रॅप लागताच काही राजकीय हालचालीही वाढल्याचे दिसून आले असून, अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराची मुळे केवळ अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नसून त्यात राजकीय हस्तक्षेपाचाही संशय व्यक्त केला जात आहे.

न्यायालयीन कोठडीत... 

कैलास गायकवाड यांच्यावरील कारवाईनंतर न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पहिल्यांदाच ‘एसीबी’ने घेतला धाडसी निर्णय

महापालिका अधिकाऱ्यांवर यापूर्वीही लाचप्रकरणी कारवाया झाल्या आहेत. काही मोठे अधिकारी बंद दाराआड हालचालींमुळे कारवाईतून बचावल्याच्या चर्चा होत असतात. मात्र, पहिल्यांदाच एसीबीने बड्या अधिकाऱ्यावर थेट कारवाई करून संबंधित संपूर्ण यंत्रणेची चौकशी सुरू केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Web Title : नवी मुंबई: रिश्वत मामले के बाद ACB की जांच के घेरे में 13 पालिका अधिकारी

Web Summary : उपायुक्त रिश्वत मामले के बाद, ACB नवी मुंबई के अतिक्रमण विभाग सहित विभिन्न विभागों के 13 पालिका अधिकारियों की जांच कर रही है। अतिक्रमण विभाग में भ्रष्टाचार के आरोपों के बाद यह कार्रवाई हुई है, जिससे राजनीतिक हस्तक्षेप की आशंका बढ़ गई है।

Web Title : Navi Mumbai: 13 Municipal Officers Under ACB Scrutiny After Bribery Case

Web Summary : Following a bribery case involving a deputy commissioner, ACB is investigating 13 Navi Mumbai municipal officers from various departments, including encroachment. This action follows allegations of corruption within the encroachment department, raising concerns about political involvement and past oversights.