कुटुंबासाठी तरी थोडासा ब्रेक हवाच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:09 PM2020-03-27T12:09:33+5:302020-03-27T12:09:56+5:30

कोरोना यमराज सैतानासारखा एक एक माणूस गिळून आपल्या कवेत घेतोय...

Need a little break for the family though ...! | कुटुंबासाठी तरी थोडासा ब्रेक हवाच...!

कुटुंबासाठी तरी थोडासा ब्रेक हवाच...!

Next

जेव्हा चीनमध्ये या अज्ञात शत्रूंनी आपला खेळ सुरू करून उद्रेक केला  तेव्हा युरोपातील काही देश गाफील राहिलेले दिसले. हा भारतात आला तर काय होईल ? असा अनेकांच्या मनात प्रश्न होता. कारण लोकसंख्या, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत आमचा जुना इतिहास काही चांगला नाही. भारतात अजूनही नागरिक बेफिकीरपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आठ कोटी लोकसंख्या असलेल्या जर्मनीत १४००० बाधित सापडतात तर आपली तर लोकसंख्या १३० कोटी आहे. कोरोना यमराज सैतानासारखा एक एक माणूस गिळून आपल्या कवेत घेतोय; मात्र माणूस संपूर्ण सरकारी यंत्रणा विनवण्या करते तरी जुमानत नाही. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नाही. मला काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासावर राहतोय.

कुठंतरी वाचलं होतं. माणसापुढं ज्यावेळी जीवणमरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी शंका कुशंका,  शक्यता - अशक्यता सगळं बाजूला गळून पडतं आणि माणसाच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. असं कुठेतरी वाचलं होतं पण हे साफ खोटं आहे हो. असं जर असतं ना. आज कोरोनाचा व्हायरस आपला जीव घेण्यासाठी कुणाच्या हातावर, साहित्यावर, चहाच्या टेबलावर, दुकानातल्या नव्या साडीवर, एखाद्या बाटलीवर, कोणत्या गाडीच्या सीटवर कुठं कुठं टपून बसलाय हे माहीत नाहीय. तरीही आपण अमरत्वाचं वरदान मिळाल्यासारखं बेफाम होऊन गर्दीत हिंडतोय. शासनानं जमावबंदी केली तरी आपण फिरतोय. एसटीने प्रवासी संख्येत कपात केलीय म्हणून आपण खासगी गाड्या, रिक्षा,  काळी पिवळीला लटकून प्रवास करतोय. आठवडे बाजार बंद करायचे आदेश असताना, तिथं जाऊन भाजी खरेदी करणारे कुटुंबवत्सल माणसं पाहिले की यांच्या अमरत्वाबद्दल खात्रीच पटती हो.

नेमकी धडपड चाललीय कशासाठी तेच कळत नाहीय. ज्या कुटुंबासाठी आपण वेगवेगळ्या गाड्यात, काळी पिवळीत गर्दी करून प्रवास करतोय, ज्या चिमुकल्यांसाठी, कुटुंबासाठी आपण भाजीपाला आणि खाऊ खरेदी करतोय त्यांच्यासाठी आपण फुकटात कोरोनाचे विषाणू तर घरी नेत नाहीत ना? याचाही विचार करायचं भान आपल्या जनतेला का नाही? हा संसर्ग विषाणू आहे हे का माणसाला समजत नाही? हा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा, डॉक्टर, आरोग्याधिकारी,  सेवक,  स्वास्थ्य केंद्र यांच्यावर किती ताण येत असेल याचा विचारही माणूस का करत नाही. या संकटाच्या काळात आत्तापर्यंत ज्याप्रकारे ही सर्व उभे झालेत ते कौतुकास्पद आहे. आपल्या कुटुंबासाठी यांना आपण थोडी साथ देऊन हे संकट टाळू शकतो.

जे पॉझिटिव्ह रुग्ण  आहेत त्यातील अजूनतरी एकही झोपडपट्टीतील किंवा गल्लीतील पेशंट नाही. एकतर ते परदेशातून आलेले आहेत किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. सव्वाशे कोटी भारतीय ही आपली याक्षणी सर्वात मोठी कमकुवत बाजू बनली आहे, कारण हा विषाणू जर भारतातील एकाही ग्रामीण भागात, झोपडपट्टीत किंवा गल्ली, मोहल्ल््यात घुसला तर प्रत्येक माणूस एका ‘बॉम्ब’ सारखा असेल, ‘मानवी बॉम्ब’ आपल्यामुळे आपल्यातील कोणीतरी मरेल लक्षात ठेवा! होणाºया नुकसानीची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. अजूनही लोक बिनधास्त अज्ञानात जगत आहेत. भरपूर गर्दी करत आहेत. लोक अजूनही शासनाच्या सूचना टाळून आपले काम करत आहेत. तुम्हीही मराल आणि सोबत कमीत कमी दहा लोकांना घेऊन मराल. शासनानं कोरोनाचा प्रसार थांबवण्याचे कितीही प्रयत्न करोत. पण मला जोवर त्याची झळ पोहचत नाही तोवर मला अक्कल येणारच नाही का? माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण घरी ‘बाबा’ येतील अशी वाट पाहणाºया चिमुकल्याची, साठी ओलांडलेल्या आई-वडिलांची तेवढी प्रतिकारशक्ती आहे का? किमान  स्वत:साठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी तरी घरी बसा.  मला काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासात राहू नका. अख्खं जग थांबलंय हो....आपणही आपल्यासाठी व  कुटुंबासाठी थोडं थांबूया का ?
- प्रा. तात्यासाहेब काटकर 
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

Web Title: Need a little break for the family though ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.