‘हुतात्मा’च्या परिपूर्ण नूतनीकरणाची अपेक्षा

By Admin | Updated: June 28, 2014 00:32 IST2014-06-28T00:32:16+5:302014-06-28T00:32:16+5:30

बरीच कामे अपूर्ण : कलाकारांना नकोय उद्घाटनाची घाई

Expectation of 'Martyr' perfect renewal | ‘हुतात्मा’च्या परिपूर्ण नूतनीकरणाची अपेक्षा

‘हुतात्मा’च्या परिपूर्ण नूतनीकरणाची अपेक्षा


सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिरच्या नूतनीकरणाची रंगमंचावरील विंगा, मेकअप रूम, प्रांगणातील सुशोभीकरण आदी बरीच कामे अपूर्ण असताना उद्घाटनाची कोणतीही घाई करायला नको. महाराष्ट्रातील सर्वोत्तम असलेल्या या नाट्यगृहाचे नूतनीकरण परिपूर्ण व्हावे, अशी अपेक्षा कलाकार, रसिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
स्मृती मंदिराच्या नूतनीकरणाची प्रक्रिया गतवर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष २४ जून २०१३ नंतर कामाला सुरुवात झाली. वर्ष उलटले तरी नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्यामुळे काही कलाकारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्याकडून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी होत आहे. पण या मुद्द्यावर मतभिन्नता असून, संपूर्ण काम झाल्याशिवाय उद्घाटन करू नये, अशीही मते व्यक्त झाली.
नाट्य व्यवस्थापक गुरू वठारे म्हणाले की, स्मृती मंदिरच्या नूतनीकरणासाठी २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पॉवर ग्रीडकडून उत्तमपणे काम सुरू आहे; पण निम्म्याहून अधिक कामे अपूर्ण आहेत. या स्थितीत उद्घाटनाची घाई केल्यास नंतर ही कामे होणार नाहीत. स्मृती मंदिरच्या मागील बाजूस कलावंतांच्या निवासासाठी खोल्या आहेत. त्यांचेही नूतनीकरण याच तरतुदीत होणार आहे. उद्घाटन झाल्यामुळे हेही काम अर्धवट राहील. त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद होणार नाही, अशीही भीती वठारे यांनी व्यक्त केली. नाट्य कलावंत अभय देशपांडे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात स्मृती मंदिरच्या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात पुणे, मुंबईच्या नाट्यगृहातही कामे केली; पण ‘हुतात्मा’ची सर अन्य कोणत्याही रंगमंचाला येत नाही. या नाट्यगृहाचे नूतनीकरण होतंय, ही आनंदाची बाब आहे. ते परिपूर्ण झाले पाहिजे. अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी हुतात्माच्या नूतनीकरणासंदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यानुसार काम झाले पाहिजे. उद्घाटनाची कोणीही घाई करू नये, असे मला वाटते.
कला रसिक प्रशांत बडवे यांनी ‘हुतात्मा’च्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी एक चळवळ हाती घेतली होती. ज्येष्ठ कलावंतांच्या माध्यमातून सोलापूरच्या नेतृत्वापर्यंत हुतात्माच्या अवस्थेची माहिती पोहोचवली होती. त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर महापालिकेने पुढाकार घेऊन पॉवर ग्रीडच्या माध्यमातून नूतनीकरणाचे काम सुरू केले. या कामाची मुदत संपली असली तरी आणखी मुदतवाढ देऊन काम पूर्ण करावे. ते परिपूर्ण असावे, अशी बडवे यांचीही अपेक्षा आहे.

---------------------------------
अपूर्ण कामे अशी...
कुंजविहारींचे स्मारक, कर्टन, मेकअप रूममधील आरशे, रंगरंगोटी, फरशीकरण, पार्किंगचे काँक्रिटीकरण, साऊंड/लाईट/ एसी, रंगमंचावरील बांबू बदलणे, रंगमंचावरील झालर, रिंगा बदलणे, शंभर एक खुर्च्या लावणे, मुख्य ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती आदी.
----------------------------------
‘हुतात्मा’च्या अर्धवट कामांची मी यादीच तयार केली असून, ती कामे झाल्याशिवाय उद्घाटन सोहळा करू द्यायचा नाही, अशी माझी भूमिका आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आले असले तरी तांत्रिक कामे तशीच आहेत. उत्तम दर्जाचे नूतनीकरण झाल्यानंतरच उद्घाटन सोहळ्याचा घाट घालावा.
- शिवानंद चलवादी
सदस्य, सेन्सॉर बोर्ड

Web Title: Expectation of 'Martyr' perfect renewal