बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश होणार

By Admin | Updated: July 7, 2014 00:49 IST2014-07-07T00:49:04+5:302014-07-07T00:49:04+5:30

१० हजार डॉक्टरांना लाभ: निमा व कृती समितीच्या प्रयत्नांना यश

B.A.M.S. The doctor will be included in the 'A-1' category | बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश होणार

बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश होणार


सोलापूर : कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन, मुंबई या संस्थेकडून ‘अ-१’ या प्रवर्गात समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. मंदार रानडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाबाबत गेल्या दोन वर्षांत ई-शेड्यूल कृती समितीने आणि निमाने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. यामुळे कर्नाटक व गोवा या राज्यातून बी.ए.एम.एस. पदवीप्राप्त व महाराष्ट्रात रहिवास व व्यवसाय करणाऱ्या १० हजार डॉक्टरांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. झाल्यानंतर महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (एम.सी.आय.एम.) या संस्थेमध्ये नोंदणी करावी लागते. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१ (एम.एम.पी. अ‍ॅक्ट) नुसार या विद्यापीठातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘ई’ प्रवर्गामध्ये समावेश करण्यात येतो. देशस्तरावर या दोन्ही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (सी.सी.आय.एम.) दिल्ली या संस्थेद्वारा प्रमाणित करण्यात येते. असे असताना प्रवर्ग ‘ई’मध्ये समाविष्ट केल्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. या विषयाचा सखोल अभ्यास केला असता असे लक्षात आले की, एम.एम.पी. अ‍ॅक्ट-१९६१ च्या कलम २९(१) नुसार महाराष्ट्र शासन स्वत:च्या अधिकाराखाली प्रवर्ग सुधारणा करू शकते. यासाठी प्रथम एम.सी.आय.एम. चे डॉ. वांगे यांची भेट घेऊन सर्व अडचणी सांगितल्या. डॉ. वांगे यांनी याचा सकारात्मक विचार करून एक प्रस्ताव बनविला व तो डॉ. कुलदीपराज कोहली (आयुर्वेद संचालनालय, महाराष्ट्र शासन) यांच्याकडे पाठविला. डॉ. कोहली यांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून तो पुढे वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडे पाठविला. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची भेट घेतली. डॉ. म्हैसकर यांनी प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. या प्रस्तावाबाबत विधी व न्याय विभागाने समितीच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार डॉ. म्हैसकर यांनी कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘ई’ प्रवर्गातून ‘ए-१’ प्रवर्गात समावेश करण्याचे आदेश दिले आहेत, असे डॉ. मंदार रानडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. नितीन बलदवा, विनायक टेंभुर्णीकर, डॉ. अभिजित भरमगोंडा, डॉ. भरत चौगुले, डॉ. रमाकांत आयाचित, डॉ. जयसिंग पांढरे उपस्थित होते.
---------------------
कृतज्ञता सोहळा...
बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश करण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वा. राजगौरव मंगल कार्यालय, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: B.A.M.S. The doctor will be included in the 'A-1' category