तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात भव्य दर्शन मंडप; वारकऱ्यांना कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:36 IST2025-11-03T10:35:33+5:302025-11-03T10:36:40+5:30
प्रशासनाने हे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात भव्य दर्शन मंडप; वारकऱ्यांना कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : देशभरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळात दर्शन मिळावे, याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने १३० कोटींचा निधी मंजूर केला असून कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. प्रशासनाने हे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्षे राहील, तसेच सर्व्हे नंबर १६१ मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा निर्णयही घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. यावर्षीच्या कार्तिकी वारीला अतिरिक्त पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा रविवारी पहाटे करण्यात आली. मानाच्या वारकरी जोडप्यांसह यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती.