८१ मुख्याध्यापकांची होणार पदावनती

By Admin | Updated: June 28, 2014 00:35 IST2014-06-28T00:35:14+5:302014-06-28T00:35:14+5:30

१०७० शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची पदोन्नती

81 Headmasters will be demoted | ८१ मुख्याध्यापकांची होणार पदावनती

८१ मुख्याध्यापकांची होणार पदावनती


सोलापूर: शिक्षण हक्क कायद्यानुसार ज्या शाळा मुख्याध्यापक पदास पात्र नाहीत मात्र तेथे मुख्याध्यापकाची नियुक्ती केली आहे, अशा ८१ शाळांमधील मुख्याध्यापकांची पदावनती केली जाणार असून, १०७० शिक्षकांना पदवीधर शिक्षक अशी पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती शिवानंद पाटील यांनी दिली़
शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले़ शिक्षण हक्क कायद्यानुसार ज्या चौथीच्या शाळांना एक किलोमीटर परिसरात ५ वीची शाळा नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करणे गरजेचे आहे, त्यामुळे जि़ प़ च्या २६० शाळांमध्ये चौथीनंतरचे पाचवीचे वर्ग सुरू केले आहेत़ जि़ प़ च्या ७ वीच्या शाळेनंतर ज्या शाळांना ३ किमी परिसरात आठवीचा वर्ग नाही अशा १६६ ठिकाणी आठवीचा वर्ग सुरू केल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी दिली़
जि़ प़ शाळांमधील ४ थी आणि ७ वीच्या जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषद सेस फंडातून भरणार आहे़ यासाठी १८ लाखांची तरतूद केली असल्याची माहिती सभापती पाटील यांनी दिली़ ज्या ८१ मुख्याध्यापकांची पदावनती होणार आहे त्यांना त्या त्या तालुक्यामध्ये समायोजन करा, वयाची ५३ गाठलेल्यांनाही त्या त्या तालुक्यात नेमणूक करा, नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल, असे मत कौशल्या माळी यांनी व्यक्त केले़ १०७० पदवीधरांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा यावेळी निर्णय झाला़ या समितीच्या बैठकीस बार्शीच्या पंचायत समितीच्या सभापती कौशल्या माळी, सांगोला पं़ स़ च्या सभापती ताई मिसाळ, सदस्या राणी दिघे, मालती देवकर, नाना भागे आदी उपस्थित होते़

Web Title: 81 Headmasters will be demoted