आयडियाची कल्पना! १ लाखाचं भाडं देऊन कोट्यवधीच्या कारमध्ये विकला 'रॉयल' चहा; कमाई किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:41 IST2026-04-17T13:39:13+5:302026-04-17T13:41:43+5:30
तुम्ही श्रीमंतांना आलिशान गाड्यांमधून फिरताना पाहिलं असेल, पण कधी कोट्यवधींच्या रोल्स-रॉयस (Rolls-Royce) मधून चहा विकला जातोय असं पाहिलंय का?

आयडियाची कल्पना! १ लाखाचं भाडं देऊन कोट्यवधीच्या कारमध्ये विकला 'रॉयल' चहा; कमाई किती?
सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि विचित्र स्टार्टअप्सचे प्रयोग पाहायला मिळतात, पण यावेळी एका व्यक्तीने हद्दच पार केली आहे. तुम्ही श्रीमंतांना आलिशान गाड्यांमधून फिरताना पाहिलं असेल, पण कधी कोट्यवधींच्या रोल्स-रॉयस (Rolls-Royce) मधून चहा विकला जातोय असं पाहिलंय का? 'रॉयल चहा' (Royal Chai) या नावाने प्रसिद्ध झालेल्या या प्रयोगाने सध्या इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. १ लाख रुपये खर्चून भाड्याने घेतलेल्या कारमध्ये चहा विकण्याच्या या कल्पनेने सर्वांनाच थक्क केलं आहे.
या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रवासाची झलक दाखवली आहे. सर्वात आधी त्याने १ लाख रुपये देऊन एक रोल्स-रॉयस भाड्याने घेतली. त्यानंतर त्याने एका स्थानिक चहावाल्याशी हातमिळवणी करून आपल्या ब्रँडिंगला सुरुवात केली. केवळ चहाच नाही, तर ग्राहकांच्या स्वागतासाठी चक्क रेड कार्पेट अंथरलं होतं आणि चहासोबत प्रीमियम कुकीज व बिस्किटंही दिली जात होती. हा 'शाही अनुभव' घेण्यासाठी रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
कशी कमाई केली?
व्हिडिओच्या शेवटी या व्यक्तीने आपली एकूण कमाई आणि खर्च यांचा खुलासा केला, जे ऐकून लोक थक्क झाले. त्याने सांगितले की, कारचे भाडे आणि बोर्ड प्रिंटिंग यांसारखे खर्च मिळून एकूण १,०८,००० रुपये खर्च झाला. तर, दिवसभर चहा विकून त्याला ८८,४०० रुपये मिळाले. गणित अगदी स्पष्ट होते - त्याला सुमारे १९,६०० रुपयांचा तोटा झाला. मात्र त्याच्या मते हा एक 'प्रयोग' होता आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला समाधान मिळालं.
सोशल मीडियावर १५ मिलियनहून अधिक व्ह्यूज
या व्हिडिओला आतापर्यंत १.५ कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. लोक या व्यक्तीच्या जिद्दीचे आणि कल्पकतेचे कौतुक करत आहेत. एका युजरने गमतीने लिहिलं, "भावा, तू वेगळ्याच ग्रहावरचा प्राणी आहेस." तर, बंगळुरूमधील एका युजरने सल्ला देताना म्हटलं की, "हा प्रयोग बंगळुरूमध्ये करून पाहा, तिथे लोक अशा लक्झरी अनुभवासाठी जास्त पैसे मोजायला तयार असतात, तिथे तुला मोठा नफा मिळेल."
तोट्यात असूनही हा 'रॉयल चहावाला' दुखी नाही. त्याचे असं म्हणणं आहे की, प्रत्येक गोष्ट केवळ पैशासाठी केली जात नाही. अनेक कुटुंबांनी या आलिशान कारसोबत फोटो काढले आणि चहाचा आस्वाद घेतला. तो म्हणतो, "भलेही पैसे कमी मिळाले असतील, पण मी अनेक लोकांच्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण जोडला आणि हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे."