पाण्याच्या टाकीत जांभळाचं लाकूड टाकण्याचा का दिला जातो सल्ला? खरंच याचा काही फायदा आहे की फक्त गैरसमज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:17 IST2026-05-14T12:09:40+5:302026-05-14T12:17:59+5:30
Jamun wood benefits for water : छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत जांभळाचं लाकूड टाकण्याचा सल्ला दिला जातो. पण का दिला जातो हा सल्ला. जाणून घ्या कारण...

पाण्याच्या टाकीत जांभळाचं लाकूड टाकण्याचा का दिला जातो सल्ला? खरंच याचा काही फायदा आहे की फक्त गैरसमज...
Jamun wood benefits for water : सध्या सगळीकडेच तापमान इतकं वाढलंय की, सकाळी सकाळी घराच्या टेरेसावरील प्लास्टिकच्या टाक्यांमधील पाणी तापू लागतं. इतकंच नाही तर टाक्यांमध्ये शेवाळ किंवा बुरशी सुद्धा जमा होऊ लागते. त्यामुळे पाण्याला एक वेगळाच वास येतो. अशात ही समस्या दूर करण्यासाठी सोशल मिडियावर एक उपाय व्हायरल झालाय. तो म्हणजे पाण्याच्या टाकीत जांभळाचं लाकूड टाकणं. पण असं केल्याने खरंच काही फायदा होतो की, हा केवळ एक गैरसमज आहे? अशात जाणून घेऊया की, ही उपाय काय आहे आणि याचा कसा फायदा होतो.
जांभळाचं लाकूडच का टाकतात?
अनेकांना हे माहीत नाही की, पाण्यात जांभळाचं लाकूड टाकणं हा एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे. पूर्वी विहिरी किंवा हौदांमध्ये जांभळाच्या लाकडाचा तुकडा टाकला जायचा. जांभळांचं लाकूड हे जलरोधक मानलं जातं. म्हणजे इतर लाकडं पाण्यात लवकर सडतात. पण जांभळाचं लाकूड पाण्यात अनेक वर्ष टिकून राहतं. याच कारणाने प्राचीन काळात विहिरींमध्ये जांभळाचं लाकूड टाकलं जायचं, ज्याला 'नेम' म्हटलं जात होतं. या लाकडाने पाणी खराब होत नाही.
मुख्य फायदे
नॅचरल अँटी-बॅक्टेरिअल गुण - जांभळाच्या लाकडामध्ये नॅचरल रूपाने असे तत्व असतात जे पाण्यात सूक्ष्म जीव आणि बॅक्टेरिया वाढण्यास रोखतात. हे एकप्रकारे नॅचरल प्युरिफायरसारखं काम करतं, ज्यामुळे पाणी जास्त काळ शुद्ध राहतं.
शेवाळ - बुरशी - प्लास्टिकच्या टाक्या उन्हात राहिल्याने काही काळाने त्यात शेवाळ तयार होतात. ज्यामुळे पाईप ब्लॉक होण्याचा धोका असतो. जांभळाच्या लाकडाने पाण्याची pH लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत मिळते, ज्यामुळे टाकी आतून स्वच्छ राहतं.
पाणी थंड राहतं - उन्हाळ्यात छतावरील प्लास्टिकच्या टाकीतील पाणी फार जास्त गरम होतं. जांभळाच्या लाकडाने हे पाणी थंड राहण्यास मदत मिळते. याने तापमान काही ड्रिग्रीपर्यंत कमी होतं.
वास आणि जडपणा कमी करणं - अनेकदा टाकीतील पाण्यात एक जडपणा किंवा क्लोरीनसारखा वास येऊ लागतो. अशात जांभळाच्या लाकडाने पाण्यातील अशुद्ध तत्व खाली बसण्यास मदत मिळते. ज्यामुळे पाणी स्वच्छ राहतं आणि त्याला वासही येत नाही.
कसा कराल वापर?
सगळ्यात आधी जांभळाच्या झाडाची जाड आणि कोरडी फांदी किंवा लाकडाचा तुकडा घ्या.
हे लाकूड व्यवस्थित घासून स्वच्छ करा, जेणेकरून त्यावरील माती किंवा धूळ निघून जाईल. (लक्षात ठेवा, लाकडावर कोणताही पेंट किंवा पॉलिश नसावं.)
आता हे लाकूड थेट पाण्याच्या टाकीत टाका. जर तुम्हाला लाकूड पाण्याच्या मधोमध ठेवायचे असेल, तर ते दोरीच्या सहाय्याने झाकणाला बांधून टांगू शकता.
वर्षातून एकदा जुने लाकूड काढून नवीन लाकूड टाकणे पुरेसे असते.
आजच्या काळात आपण महागडे वॉटर फिल्टर आणि केमिकल्सवर अवलंबून आहोत. अशा वेळी जांभळाच्या लाकडाचा हा छोटासा तुकडा आपल्याला पुन्हा निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. हे फक्त किफायतशीरच नाही, तर पर्यावरणपूरक देखील आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हीही आपल्या घराच्या पाण्याच्या टाकीत जांभळाच्या लाकडाचा वापर करून या पारंपरिक भारतीय ज्ञानाचा फायदा घेऊ शकता.