NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:29 IST2026-05-06T11:28:19+5:302026-05-06T11:29:48+5:30
७९ वर्षांच्या डॉ. संतोष गोयल यांनी इंग्रजीत सांगितले होते की, त्यांनी खडकवासला येथील 'एनडीए'मध्ये तीन वर्षे शिकवले आहे.

NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
'एनडीए'मध्ये शिकवण्याचे काम केल्याचा दावा करणारे आग्रा येथील ७९ वर्षीय डॉ. संतोष गोयल यांना लष्करी पोलिस घेऊन गेले आहेत. त्यांनी खडकवासला येथील आर्मी एज्युकेशन कोरमध्ये ३ वर्षे शिकवल्याचा दावा केला होता. जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजय मिश्र यांनी त्यांचा इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने या प्रकरणाची दखल घेतली. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना नगला पदी येथील एका घरातून घेऊन गेले असून सध्या त्यांच्यावर मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तीन दिवसांपूर्वी जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजय मिश्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये वृद्ध संतोष गोयल यांनी सांगितले होते की, त्यांनी १९७१ मध्ये इंग्रजी विषयात पीएचडी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांची निवड नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये झाली होती. एनडीएमध्ये त्यांनी ३ वर्षे इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी शिकवलेले विद्यार्थी आता लेफ्टनंट आणि कर्नल बनले आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी इंग्रजी कवी आणि लेखकांच्या ऐतिहासिक नाटकांचा उल्लेख केला, तसेच व्याकरणाच्या विविध विषयांवर आपली पूर्ण कमांड असल्याचे सांगितले.
व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी नगला पदी येथे गेले. तिथे एका घरात संतोष गोयल होते. लष्करी जवानांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना आपल्या गाडीतून सोबत घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गोयल यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, लष्कर त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत आहे आणि त्यांनी एनडीएमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते की नाही, या दाव्याची सत्यता जाणून घेत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये संतोष गोयल यांनी जीएसटी अधिकाऱ्याला सांगितले होते की, ते खडकवासला, पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये शिक्षक होते. नोकरीत असताना त्यांचे डोळे निकामी झाले, त्यामुळे त्यांना 'बोर्ड आउट' करण्यात आले. जर त्यांनी १५ वर्षांची नोकरी पूर्ण केली असती, तर आज त्यांना ७० ते ८० हजार रुपये पेन्शन मिळाली असती, पण त्यांनी फक्त ३ वर्षेच नोकरी केली. सध्या ते अत्यंत साधे आणि गरिबीचे जीवन जगत आहेत. ते एका मंदिरात राहून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री झोपण्यासाठी एका घरात जातात. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे, पण त्यांचे शिक्षण आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे.
डॉ. संतोष गोयल यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. नेत्रतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सुरुवातीला अनेक चाचण्या केल्या जातील. त्यांच्यावर कडक वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे.