Sanju Samson Fitness CSK IPL 2026: संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्मात आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १५६ धावांचे लक्ष्य गाठताना संजू सॅमसनने ५२ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावा केल्या. १६७ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना सॅमसनच्या या खेळीत सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. सलामीवीर म्हणून आलेला संजू १८व्या षटकात संघाला विजयी करून नाबाद परतला. तसेच त्याने सीएसकेच्या गोलंदाजीवेळी पूर्णवेळ किपिंगही केली. पण असे असूनही, संजू सॅमसनच्या शरीराचा आकार पाहून एका दिग्गज माजी क्रिकेटपटूला ही चिंतेची बाब वाटत आहे.
संजू सॅमसनच्या शारीरिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली आणि चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला. मात्र, नंतर मुंबईकर माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी त्याच्या शारीरिक क्षमतेवर भाष्य करून प्रश्न उपस्थित केले. "संजू सॅमसनची कामगिरी कौतुकास्पद असली तरी, त्याची सध्याची शारीरिक स्थिती सर्वोत्तम नाही, म्हणजेच त्याला आपल्या तंदुरुस्तीवर काम करण्याची गरज आहे. संजू सॅमसनला विराट कोहलीप्रमाणे आपल्या तंदुरुस्तीवर काम करण्याची गरज आहे. त्याने आपल्या फिटनेसवर काम केल्यास त्याची कारकीर्द वाढू शकते," असे संजय मांजरेकरांनी स्पोर्टस्टारच्या 'इन्साइट एज' पॉडकास्टवर सांगितले.
"संजू सॅमसन आता २५ वर्षांचा युवा राहिलेला नाही. तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. पण आता त्याला गरज आहे ती पातळी टिकवून ठेवण्याची. त्यासाठी तंदुरुस्तीची आवश्यकता आहे. कारकीर्द दीर्घकाळ कशी टिकवायची याचे उत्तम उदाहरण विराट कोहली आहे. विराट हे साध्य करू शकला कारण त्याने आपल्या तंदुरुस्तीला प्राधान्य दिले. विराटच्या क्रिकेट कौशल्याबद्दल आपण सर्व जाणतोच, पण त्याने हे देखील सुनिश्चित केले की त्याची शारीरिक स्थिती त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळा ठरणार नाही," असेही मांजरेकर म्हणाले. त्यामुळे आता संजू आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.