Sindhudurg: सरस्वतीपूजन आटोपून घरी परतताना विद्यार्थी अपघातात ठार; भरधाव कारची धडक, अन्य दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:30 IST2025-10-01T13:30:07+5:302025-10-01T13:30:51+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथील घटना; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

Sindhudurg: सरस्वतीपूजन आटोपून घरी परतताना विद्यार्थी अपघातात ठार; भरधाव कारची धडक, अन्य दोघे गंभीर जखमी
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने एका दुचाकी मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा लवू पेडणेकर (वय १६) हा जागीच ठार झाला. तर मोपेडवरील अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि.३०) दुपारी झाला. अपघातानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त नागरिकांनी दीड-दोन तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
लवू पेडणेकर (वय १६), रोशन पेडणेकर (वय १८) व सोहम परब (वय १३) हे साळगाव नाईकवाडीतील राहणारे असून, साळगाव हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहेत. मंगळवारी दुपारी साळगाव हायस्कूल येथे सरस्वतीपूजन करून हे तिघेही विद्यार्थी मोपेड स्कूटरवरून जात होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे रस्ता ओलांडत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या मोपेडला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की तिघेही फेकले गेले. यात लवू पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर रोशन पेडणेकर व सोहम परब हे गंभीर जखमी झाले. जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची घटना समजताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झाराप परिसरातील नागरिकांनी लवूचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारीही दाखल झाले.
अपघातप्रकरणी कुडाळ पोलिसांनी कारचालक राज आचरेकर (वय १८, रा. देवगड) याला ताब्यात घेतले आहे. राज व सोबत अन्य त्याचे मित्र सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होते. रास्ता रोको सुरू असताना माजी आमदार वैभव नाईक घटनास्थळी दाखल होत त्यांनी माहिती घेतली. नागरिकांनी उपस्थित असलेले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गंभीर जखमी रोशन पडणेकरला गोव्याला हलविले
या अपघातातील गंभीर जखमी रोशन पडणेकरला अधिक उपचारासाठी गोव्याला हलविले आहे. तर सोहम परब याच्यावर सावंतवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.