देवगडच्या विकासासाठी राज्यमंत्र्यांना निवेदने

By Admin | Updated: February 2, 2015 00:07 IST2015-02-01T21:17:13+5:302015-02-02T00:07:54+5:30

पर्यटनदृष्ट्या पाहता अनेक भागांतून पर्यटक येथील किल्ले, मंदिरे पाहण्यासाठी येत असतात.

Statements for the development of Devgad | देवगडच्या विकासासाठी राज्यमंत्र्यांना निवेदने

देवगडच्या विकासासाठी राज्यमंत्र्यांना निवेदने

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला. त्यातील देवगड हा एक तालुका सध्या नवा आकार घेत आहे. पर्यटनदृष्ट्या पाहता अनेक भागांतून पर्यटक येथील किल्ले, मंदिरे पाहण्यासाठी येत असतात. या तालुक्याचा विकास साधण्याच्या दृष्टीने जामसंडे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामीण आरोग्य व पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांना तालुक्यातील विविध गोष्टींसंदर्भात निवेदने देण्यात आली.यावेळी देवगड तालुक्यातील जामसंडे गाव पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वाचे गाव आहे. जामसंडे गावाच्या एका बाजूने समुद्र व दोन बाजूने खाडी आहे. या खाडीमध्ये बोटिंग सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांचा ओढा वाढून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. त्याचबरोबर जामसंडे मळई-कावलेवाडी-तरवाडी खाडी किनाऱ्यावरून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असून, हा रस्ता पर्यटनदृष्ट्या सुशोभीकरण केल्यास त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेने पर्यटकांना चालण्यासाठी वॉकिंग पाथ, स्ट्रीटलाईट उपलब्ध करावी. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री दिर्बादेवीची जत्रा जामसंडे येथे थाटामाटात पार पडते. हजारो भाविक विविध भागांतून देवीला नवस व साकडे घालण्यासाठी येत असतात. पुरातन काळातील मूर्ती येथील मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या धार्मिक पर्यटनस्थळाला शासनाने ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे, परंतु विकासाच्यादृष्टीने पाहता येथील विकास रखडलेला आहे. त्यामुळे याचा परिणाम येथील पर्यटनावर दिसत आहे. त्यामुळे या धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या जामसंडे ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आल्या. (वार्ताहर)

Web Title: Statements for the development of Devgad