कडाक्याच्या थंडीतही अभियंत्याचे उपोषण सुरुच

By Admin | Updated: January 29, 2015 23:40 IST2015-01-29T21:46:26+5:302015-01-29T23:40:42+5:30

जिल्हा प्रशासनाकडून चौथ्या दिवशीही दखल नाहीच

The engineer's hunger strike started in the cold | कडाक्याच्या थंडीतही अभियंत्याचे उपोषण सुरुच

कडाक्याच्या थंडीतही अभियंत्याचे उपोषण सुरुच

रत्नागिरी : सेवेतून बेकायदेशीररित्या कमी केल्याने न्याय मिळावा, यासाठी देवरूख येथील अभियंता राजेंद्र चव्हाण यांचे कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूच आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन मात्र, या उपोषणाबाबत बेदखल असल्याचे दाखवत आहे.देवरूख येथील राजेंद्र धर्माजी चव्हाण यांना मुदतीत शैक्षणिक अर्हता संपादन केली नसल्याच्या कारणावरून १९८८ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडून अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. याबाबत त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरीही उमेद न घालवता चव्हाण यांनी कधी पत्रव्यवहार, अर्ज -विनंत्या तर कधी उपोषण करून दाद मिळविण्याचा प्रयत्न केला.
याबाबत आठ महिन्यापुर्वीच शासनाने नवीन अध्यादेश काढला. त्यानुसार अशा व्यक्तींना सेवेतून कमी न करता त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, असे नमूद करण्यात आले होते. अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेलाही पाठविण्यात आले होते. त्यानंतरही चव्हाण यांना दिलासा वाटल्याने त्यांनी पुन्हा सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचा आडमुठेपणा कायम राहिला, असे उपोषणकर्त्या चव्हाणांचे म्हणणे आहे.
सेवेतून कमी करण्यात आल्याने सुमारे २७ वर्षे चव्हाण यांना बेरोजगारीचा व इतर अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अद्याप त्यांना जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागले आहे. २६ जानेवारीपासून अभियंता चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे.
कडाक्याच्या थंडीतही ते उपोषणाच्या ठिकाणी दिवसरात्र असूनही, याची दखल जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घ्यावीशी वाटत नाही. याबाबत आपल्याला न्याय मिळाला नाहीच तर आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे राजेंद्र धर्माजी चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The engineer's hunger strike started in the cold