जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:47+5:302021-05-21T04:41:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित होत ...

Two more Zilla Parishad employees die due to corona | जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. मागील १० दिवसांत ७८ कर्मचारी बाधित झाले आहेत, तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत कर्मचारी रुग्णसंख्या १३७२ झाली असून, बळींचा आकडा २३ झाला आहे. सध्या ४४३ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून वर्षाचा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या पहिल्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. जुलै महिन्यापासून तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होता. याच काळात जिल्हा परिषदेतही कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील अर्थ, शिक्षण, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, आरोग्य आदी विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत.

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण १३७२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यामधील तब्बल ७८ बाधित हे १० मेनंतर स्पष्ट झाले आहेत. एवढ्या वेगाने कर्मचारी बाधित झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत सर्वाधिक २२८ कर्मचारी बाधित झाले आहेत, तर फलटण तालुका १८७, कोरेगाव १७०, कऱ्हाड १७१, खटाव १३७, खंडाळा ८८, जावळी ४१, पाटण ९२, महाबळेश्वर तालुका ५१, माण १२३ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या १०६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना बळींचा आकडा २३वर पोहोचला आहे. यामधील दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू १० दिवसांत झालेला आहे.

खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर सातारा तालुक्यातील चौघांचा, तर पाटण आणि फलटण तालुक्यातील तिघांचा तसेच कोरेगाव, जावळी आणि माण तालुक्यातील प्रत्येकी २ तसेच कऱ्हाड आणि महाबळेश्वर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.

चौकट :

९०६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात...

जिल्हा परिषदेच्या १३७२ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामधील ९०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १३५ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १७२, पाटण ८४, कऱ्हाड १३७, महाबळेश्वर ४१, खटाव ६८, वाई ७५, फलटण तालुका ६४, खंडाळा ४६, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४४३ कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

....................................................

Web Title: Two more Zilla Parishad employees die due to corona