Satara Crime: वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याचे विवस्त्र करून रॅगिंग!, पाचगणीतील शाळेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:54 IST2025-07-15T15:54:14+5:302025-07-15T15:54:50+5:30
दोन्ही मुले भीतीने शाळेतून पुण्याला पळाली

Satara Crime: वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याचे विवस्त्र करून रॅगिंग!, पाचगणीतील शाळेतील घटना
सातारा : पाचगणी परिसरातील एका शाळेमध्ये दोघा मुलांचे त्याच वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वर्गमित्रांनी एका मुलाला विवस्त्र केले. इतकेच नव्हे तर रॅगिंगच्या भीतीने दोन्ही मुले पुण्याला पळून गेली होती. याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवल्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी सातारा येथे बाल न्यायालयाकडे पाठविले आहे.
पाचगणी परिसरात एक प्रसिद्ध शाळा आहे. या शाळेमध्ये एक १४ वर्षांचा मुलगा नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. त्याने १० जुलै रोजी रात्री सव्वासात वाजता त्याच्या पालकांना फोन करून माझे दोन वर्गमित्र मला व माझ्या मित्राला मारहाण करीत आहेत. माझी पँट काढत आहेत. त्यामुळे मी व माझा मित्र शाळेतून पळून एसटीने घरी येत आहे. आता वाईपासून पुढे आलो आहोत, असे सांगितले. यानंतर संबंधित पालकांनी तातडीने त्यांच्या नातेवाइकाला पुण्यात मुले पोहोचल्यानंतर मुलांना भेटण्यास सांगितले.
रात्री दीड वाजता दोन्ही मुले पुण्यात सुखरूप पोहोचली. त्यानंतर त्यातील एका मुलाचे पालकही तेथे पोहोचले. मुलाकडे पालकांनी विचारपूस केल्यानंतर त्याने वर्गातील दोन मित्रांनी २३ जून रोजी रात्री साडेआठ वाजता मला विवस्त्र केले. यावेळी तेथे इतर मुलेही होती. ते दोघेजण मला लाथा मारून हसत होते. त्यानंतर घडलेला प्रकार मी आमच्या शाळेत सांगितला.
तसेच ६ जुलै रोजीही पुन्हा असाच प्रकार घडला. पँट नाही काढली तर मारहाण करण्याची धमकी दिली, असेही त्या मुलाने पालकांना सांगितले. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी या प्रकाराची माहिती पाचगणी पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधित मुलांच्या पालकांना बोलावून जाब-जबाब नोंदविले. त्यानंतर हे प्रकरण सोमवारी बाल न्यायालयात पाठविले.
हे प्रकरण पाचगणी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी आले होते. आम्ही पालकांना बोलावून त्यांचे जबाब घेतले आहेत. ही मुले अल्पवयीन आहेत. त्यामुळे बाल न्यायालयात हे प्रकरण पाठविण्यात आले आहे. तसेच पोलिसही यामध्ये सखोल तपास करीत आहेत. - दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक, पाचगणी