बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची आज संधी

By Admin | Updated: December 5, 2014 23:17 IST2014-12-05T22:06:28+5:302014-12-05T23:17:32+5:30

पावले तरडगावकडे : महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन रॅली

Today's opportunity to visit Darshan of Babasaheb Asthastha | बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची आज संधी

बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची आज संधी

तरडगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेल्या फलटण तालुक्यातील निंभोरे या गावी जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी शनिवार दि. ६ डिसेंबर या महापरिनिवाणदिनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र येणार आहेत. दोन वर्षापूर्वी प्रतिचैत्यभूमी म्हणून नावारुपास आलेल्या निंभोरे या गावी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी होणारी वाढती गर्दी पाहता भविष्यात तेथील परिसराचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फलटण तालुक्यातील निंभोरे या गावचे रहिवाशी सीताराम कांबळे, रामू कांबळे, शिवराम कांबळे हे डॉ. आंबेडकरांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईला गेले असताना त्या काळी त्यांनी बाबासाहेबांच्या काही अस्थी आपल्या गावी आणल्या होत्या. निंभोरे येथील बुद्ध विहारामध्ये डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश आहे. हे जिल्ह्यातील बहुतांश अनुयायांना माहित नव्हते. मात्र सन २०१२ मध्ये ६ डिसेंबर या दिनी तेथे तालुक्यातील विविध गावातील भीम सैनिकांनी निंभोरे गावापर्यंत अभिवादन रॅली काढुन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यावेळी विविध संघटनानी एकत्र येवून दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी निंभोरे येथे येण्याचा संकल्प केला. अन् तेव्हापासून निंभोरे हे गाव प्रतीचैत्यभूमी म्हणून नावारुपास येवू लागले.
जिल्ह्यातील अबाल वृद्ध, लहान मुले यांना मुंबई याठिकाणी लाखोंच्या गर्दीमध्ये दर्शन घेणे शक्य नाही. त्यांच्यासाठी हे गाव भविष्यात सोयीस्कर ठरणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बुद्ध विहार परिसराचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)

Web Title: Today's opportunity to visit Darshan of Babasaheb Asthastha