Satara Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकली; एक ठार, १३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:26 IST2025-11-27T16:26:09+5:302025-11-27T16:26:35+5:30
फलटण (जि. सातारा) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड, ता. फलटण येथे मुंबई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या ...

Satara Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकली; एक ठार, १३ जण जखमी
फलटण (जि. सातारा) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड, ता. फलटण येथे मुंबई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स दुभाजकावर जाऊन जोरदार आदळली. विशेष म्हणजे या दुभाजकामध्ये रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.
जालिंदर लक्ष्मण सस्ते (वय ६०, रा. बरड, ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ट्रॅव्हल्समधील सतीश वरळीकर (४५), मंदा शिवडीकर (६९), रेखा वरळीकर (५६), सुप्रिया शिवडीकर (३५), ज्ञानेश्वर कोळी (६५), मनीषा वरळीकर (४०), नरेंद्र सपकाळ (५२), शारदा पाटील (६०), माधुरी टीनी (४०), दीपक दुभे (३५), कलावती वरळीकर (३५), सुहास शिवडीकर (५), हेमंत वरळीकर (४५, सर्व रा. वरळी कोळीवाडा, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिस अन् घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थी विसर्जनासाठी मिनी ट्रॅव्हल्स (एमएच ०५ एफजे ९७०५) निघाली होती. ही ट्रॅव्हल्स बरडजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर जोरदार आदळली.
याचवेळी दुभाजकामध्ये रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या जालिंदर सस्ते यांना जोरात धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमध्ये १७ लोक प्रवास करत होते. यापैकी तेराजण जखमी झाले. यामध्ये चालक दीपक कुमार, चालक देवीदिन मलपूर (भदोन उत्तर प्रदेश) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना उपचारासाठी फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
काहीक्षणापूर्वी जागा सोडली अन् जीव वाचला
या अपघातात दोन जण नशीब बलवत्तर म्हणून वाचले. मृत जालिंदर सस्ते यांच्या अगदी शेजारीच एक शाळकरी मुलगा व दुसऱ्या बाजूला गावातील एक जण उभा होता. ट्रॅव्हल्सची धडक होण्यापूर्वी एक-दोन सेकंद अगोदर दोघांनी जागा सोडली व त्यांचे प्राण वाचले.
बॅरिकेट्स व्यवस्थित लावली असती तर
या ठिकाणी काम सुरू असून, कच्चे बॅरिकेट्स लावली आहेत. यामध्ये लोकांना ये-जा करता येईल एवढी जागा असल्याने त्यातून लोक अलीकडे पलीकडे करत होते. बॅरिकेट्स व्यवस्थित लावली असती तर या ठिकाणी ही लोक थांबली नसते आणि अपघातात जीव गेला नसता.