Satara: महू धरणाचं पाणी झालं हिरवं गडद; नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:37 IST2025-08-30T16:36:41+5:302025-08-30T16:37:25+5:30
संबंधित विभाग आणि कृष्णा पाटबंधारे विभागाला याची कल्पना असूनही ठोस उपाययोजना करण्यास दिरंगाई

Satara: महू धरणाचं पाणी झालं हिरवं गडद; नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका
दिलीप पाडळे
पाचगणी : महू धरण जलाशय पाण्याला हिरवा गडद रंग चढला आहे. नदी प्रवाहातून वाहणारे पाणी सुद्धा हिरवे गडद वाहत आहे. नदीकाठच्या लोकांना या दूषित पाण्याने संसर्ग बाधा होण्याचा धोका असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभाग आणि कृष्णा पाटबंधारे विभागाला याची कल्पना असूनही ठोस उपाययोजना करण्यास दिरंगाई होत आहे. तर हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहून नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे धरण म्हणून याकडे नजरा लागल्या आहेत. सध्या मात्र धरण जलाशय वेगळ्याच समस्याने ग्रासले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून धरणातील पाणी हिरवे झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य होते. आजमितीस या पाण्याला गडद हिरवा रंगाने वेढले असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कृष्णा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या महू धरणाच्या हिरव्या गडद झालेल्या पाण्याबाबतची वस्तुस्थिती पाटबंधारे विभाग व प्रदूषण महामंडळाच्या निदर्शनास आल्यावर १५ दिवसांपूर्वी पाण्याची तपासणी केली होती. मधल्या काळात पाणी स्वच्छ होऊ लागले होते. मात्र, आता अचानक पाण्याने रंग बदलल्याने तर्कवितर्क आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
अनेक पाणीपुरवठा योजना नदीकाठी
महू धरणातील विसर्ग होणारे पाणी नदीने प्रवाहाने वाहत आहे. अनेक पाणीपुरवठा योजना नदीकाठी आहेत, तर पाळीव जनावरेही नदीचे पाणी पीत आहेत. यामुळे हा आरोग्यकरिता खूप मोठा धोका मानला जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाने धरणातील पाणी तपासले आहे. यामध्ये हे शेवाळ सदृश्य असल्याने पाण्याचा रंग हिरवा आहे. तर, धरणाखालील गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र तपासणी केली. यामध्ये दूषितपणा आढळून आला नाही, तरी पुन्हा कृष्णा पाटबंधारे विभाग व प्रदूषण महामंडळ संयुक्तपणे पाणी तपासणी करणार आहोत. तरी नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. - अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (सातारा)
धरण जलाशयात येणारे पाण्याचे स्तोत्र तपासले असून, ते स्वच्छ आहे. तर धरणातील शेवाळ सदृश्य हिरवे पाणी आहे. तरी सुद्धा धरणातील पाण्याचे तपासणी अहवाल पाणी पिण्यायोग्य नाही. हे ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि आरोग्य विभागास पाठवून सूचित करण्यात आले आहे. -नरेंद्र घार्गे, कृष्णा पाटबंधारे कालवे, विभाग २ सातारा