पुन्हा मुसळधार ! तासात ७० मिलिमीटर : नागरिकांची पळापळ

By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:27:19+5:302014-08-22T00:52:56+5:30

जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, खटाव परिसरातही सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी खटाव परिसरातील बळिराजा सुखावला

Massive again! 70 mm in the hour: Citizen's escape | पुन्हा मुसळधार ! तासात ७० मिलिमीटर : नागरिकांची पळापळ

पुन्हा मुसळधार ! तासात ७० मिलिमीटर : नागरिकांची पळापळ

सातारा : सातारा शहरासह परिसरात काल, बुधवारी सायंकाळी ढगफुटी झाली. त्याचप्रमाणे आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे सातारकरांची दाणादाण उडाली. तासाभरात शहरात तब्बल ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारचा गुरुवारी आठवडा बाजार असतो. तसेच गणेशोत्सवास पुढच्या आठवड्यात सुरुवात होत असल्याने गौरी-गणपतीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले होते. हे खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोक साताऱ्यात आले होते. दिवसभर ऊन पडलेले होते. सायंकाळी साडेचारनंतर अचानक काळे ढग जमा झाले. त्यामुळे साडेचारलाच वाहनचालकांना दिवे लावून वाहने चालवावी लागत होती. सोसाट्याचा वारा सुरू झाला अन् पावणेपाचला मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्या बुडाल्या, त्याचबरोबर अनेक घरांत पाणी घुसले. अनेक रस्त्यांवर तळे साचल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील अनेक रस्त्यांवरून ओढे वाहत असल्यासारखे पाणी वाहत होते. सखल भागामध्ये पाण्याची तळी साचली. डोंगर उतारावरून मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यावर चिखल व दगड साचले होते.
जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, खटाव परिसरातही सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी खटाव परिसरातील बळिराजा सुखावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Massive again! 70 mm in the hour: Citizen's escape