‘तो’ घरफोडी करायचा अन् मैत्रीण मुद्देमाल विकायची; सातारा शहर पोलिसांकडून दोघांनाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:35 IST2025-11-28T15:34:14+5:302025-11-28T15:35:05+5:30
महाराष्ट्रासह परराज्यांत ३५ गुन्हे, ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

‘तो’ घरफोडी करायचा अन् मैत्रीण मुद्देमाल विकायची; सातारा शहर पोलिसांकडून दोघांनाही अटक
सातारा : महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडीचे तब्बल ३५हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या तरुण, तरुणीला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली. तेव्हा तो तरुण घरफोडी करायचा तर त्याची मैत्रीण चोरीचा मुद्देमाल विकायची, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय. या दोघांकडून पोलिसांनी ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सॅमसन रुबीन डॅनियल (वय २७), प्रिया (वय १९, बदलेले नाव, दोघेही रा. कल्याण, मुंबई) अशी अटक केलेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत.
साताऱ्यात १ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचा ऐवज चोरीस गेला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपीची ओळख पटवली. सॅमसन डॅनियल हा रेकाॅर्डवरील सराईत आरोपी असून, तो कल्याण मुंबई येथे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजीत भोसले, संतोष घाडगे, सुहास कदम हे चाैघेजण कल्याण येथे गेले. तेथे गेल्यानंतर डॅनियल हा हैदराबाद येथे गेल्याचे समजले.
यानंतर पोलिसांचे हे पथक हैदराबादला गेले. तेथे जाऊन त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. डॅनियल याच्यावर यापूर्वी साताऱ्यासह मुंबई, कोल्हापूर, कोकण तसेच परराज्यांत ३५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे घरफोडी केल्यानंतर चोरीचा माल तो मैत्रिणीकडे द्यायचा. त्यानंतर त्याची मैत्रीण चोरलेला मुद्देमाल विकायची. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी त्या मैत्रिणीलाही अटक केली. त्यांच्याकडून चार तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
मोबाइल चोरटाही अटकेत
किराणा मालाचे साहित्य व मोबाइल चोरीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सुदीप उर्फ गोट्या संजय मेंगळे (वय १९, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याला अटक केली. चोरी केलेले चार मोबाइल त्याने मित्रांना विकले होते. हे सर्व मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले.