देवाला कोंडून म्हणे.. धोंडी धोंडी पाऊस दे!

By Admin | Updated: August 24, 2015 23:15 IST2015-08-24T23:13:10+5:302015-08-24T23:15:02+5:30

वरुणराजाला साकडे : सायगावमध्ये शिवलिंग डोक्यावर घेऊन गावातून दिल्या आरोळ्या; पाटण तालुक्यातील बहुले, गारवडेत कोंडला महादेव

God forbid. Give the stone a bucket of rain! | देवाला कोंडून म्हणे.. धोंडी धोंडी पाऊस दे!

देवाला कोंडून म्हणे.. धोंडी धोंडी पाऊस दे!

सायगाव/मल्हारपेठ : पावसानं ओढ दिल्यानं हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाला आहे. लवकर पाऊस पडावा, दुष्काळ हटावा, यासाठी जावळी तालुक्यातील महिगाव येथील युवकांनी वरुणराजाला ‘मेघराजा पाऊस दे... शेरडं-करडं जगू दे.. असे भावनिक आवाहन केले तर पाटण तालुक्यातील बहुले, गारवडी परिसरातील ग्रामस्थांनी महादेवाला जलाभिषेक घालून देवाला कोंडून ठेवले.
सायगाव पश्चिम भागात यंदा पिके जोमात आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. ‘पाऊस मागणे’ यासारख्या प्रथेतून बळीराजा अगतिक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दोन युवकांना कमरेला लिंबाचा पाला गुंडाळून डोक्यावर शिवलिंग देऊन दारोदार आरोळ्या देत फिरविले जाते. त्यांच्या डोक्यावरील पिंडीवर जलाभिषेक केला जातो. यामुळे पाऊस पडेल, अशी लोकांमध्ये धारणा आहे.
पाटण तालुक्यात पिके फुलोऱ्यात आली आहेत, मात्र पाऊस नसल्यामुळे फलधारणा धोक्यात आली आहे. ढगाळ वातावरण असून पाऊस पडत नाही. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन फेरी काढली. त्यानंतर महादेवाला जलाभिषेक घालून पिंडीला पाण्यात ठेवण्यात आले. अशा प्रकारे देवाला कोंडल्यामुळे पाऊस पडतो, अशी लोकांमध्ये धारणा आहे. (वार्ताहर)
असा मागितला जातो पाऊस
दोन युवकांच्या कमरेला लिंबाचे डहाळे गुंडाळतात
डोक्यावर शिवलिंग ठेवून दारोदार फिरविले जाते
आरोळ्या देऊन वरुणराजाला आवाहन केले जाते
गावकरी डोक्यावरील पिंडीला जलाभिषेक करतात
प्रत्येक घरातून भाजी-भाकरीचा शिधा दिला जातो
एकत्र गोलाकार बसून शिधा आवडीने खातात
जोवर पाऊस पडत नाही, तोवर रोज पाऊस मागतात
पावसासाठी आरोळ्या
मेघराजा पाऊस दे, शेरडं करडं जगू दे...
धोंडी राहिला शिवेवर, पाऊस आला गावावर
कोण म्हणतं येत नाय, आल्याशिवाय राहत नाय!

Web Title: God forbid. Give the stone a bucket of rain!